मुंबई शहर आणि उपनगरातील 18 पूल धोकादायक

13
फोटो प्रातिनिधीक

सामना ऑनलाईन, मुंबई

शहर आणि उपनगरातील तब्बल 18 पूल धोकादायक बनले असून ते दुरुस्तीच्याही पलीकडे आहेत. हे सर्व पूल पाडून टाकणे गरजेचे असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. महाडच्या सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील पुलांचे जे सर्वेक्षण केले होते त्याच्या अहवालात ही माहिती पुढे आली आहे. या सर्व पुलांच्या बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थायी समिती सदस्यांनी आजच्या बैठकीत केली.

महाड पुलाच्या दुर्घटनेत अनेक जणांचे जीव गेल्यानंतर मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर पालिका प्रशासनाने मुंबईतील 296 पुलांच्या सर्वेक्षणासाठी सल्लागारही नेमले होते, मात्र या सर्वेक्षणाचा अहवाल कधीच बाहेर आला नाही. अंधेरीच्या गोखले पुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वेच्या हद्दीतील पुलांचे सर्वेक्षण करण्यात आले, मात्र पालिकेच्या पुलांचे सर्वेक्षण झालेच नाही. त्यामुळे अंधेरी पुलाच्या दुर्घटनेनंतर या सर्वेक्षण कामाने पुन्हा वेग घेतला. या सर्वेक्षणात 18 पूल अतिधोकादायक आढळून आले आहेत. या पुलांच्या बाबत तातडीने निर्णय घेऊन हे पूल पाडून टाकावेत तसेच काही पुलांची दुरुस्ती करावी अशी मागणी आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. या पुलांच्या बाबत चालढकल केल्यास मोठा अपघात होऊ शकतो, असेही ते यावेळी म्हणाले. त्यांच्या मागणीला शिवसेनेचे सदानंद परब, सभागृह नेत्या विशाखा राऊत, मंगेश सातमकर यांनीही पाठिंबा दिला.

दरम्यान, हा अहवाल नुकताच पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर केला असल्याचे समजते. तसेच धोकादायक पुलांचे आयुर्मान पाहून पूल पाडून टाकण्यासाठी व नवीन पूल बांधण्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येणार असल्याचे समजते.

हे आहेत धोकादायक पूल

पादचारी पूल

यलो गेट पादचारी पूल, मस्जिद बंदर, पूर्व  चंदनवाडी पादचारी पूल, मरीन लाइन्स  वीर संभाजी नगर, रमाबाई पाडा, मुलुंड पश्चिम

बर्वे नगर पादचारी पूल  पंथेरनगर, मातृछाया चाळीजवळ विक्रोळी पूर्व  साकी विहार रोड पवईजवळचा पादचारी पूल  चंदनवाडी रेल्वे पादचारी पूल मरीन लाइन्स  टिळक नगर रेल्वे पादचारी पूल

उड्डाणपूल

हंस भुग्रा मार्ग पाइपलाइन रोड, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड  एसबीआय कॉलनी, दहिसर  गांधी नगर टेकडी कुरार व्हिलेज, मालाड  वालभट नाला, निरलॉन, गोरेगाव पूर्व  रामनगर चौक बिहारी टेकडी, कांदिवली  विठ्ठल मंदिर, इराणी वाडी, कांदिवली

एस. व्ही. पी. कृष्णकुंज इमारतीजवळ, कांदिवली  आकुर्ली रोड, हनुमान नगर, कांदिवली  हरी मशीद नाला, खैरानी रोड, कुर्ला  चिराग नगर, घाटकोपर पश्चिम

 

आपली प्रतिक्रिया द्या