मरणाच्या भीतीने फिरोज संतापला

सामना प्रतिनिधी, मुंबई

विशेष टाडा न्यायालयाने करीमुल्ला खान, अबू सालेम आणि रियाझ सिद्दिकीच्या शिक्षेचा फैसला केल्यानंतर आरोपी फिरोज अब्दुल रशिद खान याला मरेपर्यंत फासावर लटकविण्याचे आदेश दिले. अचानक बसलेल्या या धक्क्याने फिरोझला कापरे भरले. त्याला घाम फुटला. तसेच त्याचे डोळेही पाणावले. त्याच्या ओठातून शब्द फुटेनासे झाले. मृत्यू समोर दिसू लागल्याने फिरोज आरोपीच्या पिंजऱ्यातच कोसळतो की काय असे सर्वांना वाटू लागले. त्यावेळी इतर आरोपींनी त्याचे फक्त शब्दांनी सांत्वन केले. मात्र सालेम आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि त्याने सांत्वनासाठी फिरोजच्या खांद्यावर आपला हात ठेवला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता फिरोजने सालेमचा हात दूर झटकून टाकला.

वास्तविक या निकालाने फिरोझ पार कोसळला होता. त्याचे डोळेही पाणावले. उद्या आपले काय होईल या चिंतेने कदाचित तो रात्रभर झोपला नसावा, असे त्याच्या सुजलेल्या डोळय़ांकडे पाहून वाटत होते. त्याची ही वागणूक सालेमला अनपेक्षित नसावी. त्यामुळे फिरोजने अपमान केल्यानंतरही सालेमने त्याला उलटून उत्तर दिले नाही. उलट सालेम चूपचाप आपल्या जागेवर जाऊन बसला.

या निर्णयाने फिरोजला जेवढा हादरा दिला तेवढाच ताहिर मर्चंटलाही दिला, परंतु त्याने ते चेहऱ्यावर दिसू दिले नाही. न्यायाधीश सानप हे जेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावत होते तेव्हा तो ती शांतपणे ऐकून घेताना दिसला.

सालेम, सिद्दिकीच्या गावात शुकशुकाट
उत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्हय़ातील अबू सालेम, रियाझ सिद्दिकीच्या घराबाहेर सन्नाटा आहे. २००७ मध्ये सालेमच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिथे सालेमचे तिघे भाऊ राहत होते. त्यातील दोघे व्यवसायानिमित्त बाहेरच असतात. सालेमचा मोठा भाऊ हाकीम ऊर्फ चूनचून सहकुटुंब राहत होता. मात्र, आज त्याच्या कुटुंबासह तो कुठेच दिसला नाही.

सालेमच्या जन्मठेपेने त्याच्या वकिलाचे डोके दुखायला लागले
मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा सूत्रधार अबू सालेम याला विशेष टाडा न्यायालयाने आज दुपारी जन्मठेप ठोठावली आणि त्याचवेळी त्याचे वकील असलेल्या सुदीप पासबोला यांचे डोके दुखायला लागले. कदाचित हा योगायोग असेलही. परंतु त्यांच्या या डोकेदुखीमुळे शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी मात्र उद्यापर्यंत तहकूब करावी लागली.

बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी चौथ्या मजल्यावर सुरू होती तर तिसऱ्या मजल्यावर शीना बोरा हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यासाठी सत्र न्यायाधीश जगदाळे, कोर्टाचे कर्मचारी तसेच इतर वकील मंडळी इंद्राणी मुखर्जीचे वकील असलेल्या अॅड. पासबोला यांची वाट पाहत बसले होते. अॅड. पासबोला हे सालेमचेही वकील आहेत. तब्बल 15 मिनिटे वाट पाहावयास लावून अॅड. पासबोला हे कोर्टरूममध्ये आले. मात्र येताच क्षणी त्यांनी त्यांचे डोके दुखत असल्याने शीना बोरा प्रकरणाची सुनावणी तहकूब करून पुढची तारीख देण्याची मागणी केली. न्यायाधीश जगदाळे यांनीदेखील त्यांची मागणी मान्य करून उद्या सुनावणी ठेवली.

हा तर ऐतिहासिक निकाल – अॅड. उज्ज्वल निकम
बॉम्बस्फोट मालिका घडविल्याप्रकरणी सालेमसह एकूण ५ जणांना शिक्षा ठोठावताना विशेष टाडा न्यायालयाने दिलेला निकाल हा एकप्रकारे ऐतिहासिक निकाल आहे. या निकालामुळे या खटल्यातील दाऊद इब्राहिम कासकर आणि टायगर मेमनसारख्या फरारी आरोपींनाही भविष्यात अशाच प्रकारच्या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे, असे या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. या प्रकरणात सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून खटल्याचे कामकाज चालवीत असताना आपण १२३ आरोपींविरुद्ध भक्कमपणे केस मांडली. त्याच वेळी सालेमला पोर्तुगालहून हिंदुस्थानात आणण्यात आले, अशी आठवणही अॅड. निकम यांनी करून दिली.