गोंदियात दोन चिमुरड्य़ांचा गोधडीखाली गुदमरून मृत्यू

सामना प्रतिनिधी । गोंदिया

दोन चिमुरड्य़ा भावंडांचा गोधडीखाली गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अडीच वर्षीय डेव्हिड आणि नऊ महिन्यांच्या चहल पुंडे यांनी प्राण गमावले. गोंदिया जिह्यातील आमगाव तालुक्यात धोबीटोला गावात हा प्रकार घडला. अंगावर जड पांघरुण घेतल्यामुळे श्वास कोंडल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. मात्र मोठ्य़ा मुलाच्या तोंडातून फेस निघत असल्याने विषबाधा झाली असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. काल रात्री नऊ वाजताच्या सुमारास आई प्रीती यांनी चिमुरड्य़ांना दूध पाजून झोपवलं. पुन्हा औषध देण्यासाठी त्यांना उठवायला गेली असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे तिच्या लक्षात आले.

जेवणानंतर मुलांना दूध पाजून झोपवल्यामुळे दुधातून विषबाधा झाली नाही ना, या दिशेने पोलीस तपास करत आहेत. दुधाची बाटली, उर्वरित दूध आणि मुलांनी घातलेले गरम कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर या चिमुरड्य़ांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल.