गोधडीखाली गुदमरून २ चिमुकल्यांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील धोबीटोला येथे गोधडीखाली गुदरमरून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. डेव्हिड पुंडे (दीड वर्ष) आणि चहल पुंडे (९ महिने) अशी गुदमरून मृत्यू झालेल्या दोन सख्या भावंडांची नावे आहेत.

धोबीटोला गावातीत प्रिती मुंडे यांनी मंगळवारी रात्री दोन्ही मुलांना खाऊ घातले आणि रात्री ९च्या सुमारास अंगावर गोधडी टाकून झोपवले. त्यानंतर एक तासाने औषध पाजण्यासाठी प्रिती यांनी मुलांना उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा दोन्ही मुलांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या प्रिती यांनी याची माहिती पती खिलेश पुंडे यांना दिली. त्यानंतर दोन्ही मुलांना आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले.

दोन्ही मुलांचे मृतदेह शवविच्छेदनाकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवल्यानंतर मुलांना गाढ झोप लागल्याने आणि अंगावर गादी असल्याने दोघांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. प्रिती पुंडे यांनी मंगळवारी रात्री दोन्ही मुलांना जेवण दिल्यानंतर दूध पाजून झोपवले होते. त्यामुळे दुधातून विषबाधा झाली नाही ना? या दिशेने पोलीस तपास करत आहे.