LTT इथे प्रवाशांना गुंगीची बिस्कीटे देऊन लुटणारी टोळी अटकेत

सामना ऑनलाईन, मुंबई

रेल्वे पोलिसांनी लोकमान्य टिळक टर्मिनस इथे येणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केलं आहे. संजय पटेल आणि अरविंद प्रसाद अशी या दोघांची नावे असून हे दोघेही जण मूळचे बिहारचे आहेत. या दोघांनी किमान 12 प्रवाशांना लुटल्याचं कबूल केलं आहे, मात्र पोलिसांना संशय आहे की या दोघांना याहून अधिक जणांना लुटले आहे.

8 मार्च रोजी निलेश सोमवंशी आणि सचिन गायसमुद्रे या आरपीएफ जवानांना टिळक टर्मिनसवर गस्त घालत असताना संजय पटेल आणि अरविंद प्रसाद संशयास्पदरित्या वावरताना दिसले. हे दोघे जण तिकीट रिझर्वेशन सेंटरजवळ प्रवाशांसी उगाच बोलत असल्याचं या पोलिसांना जाणवलं. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली. सुरुवातीला या दोघांनी आपण पनवेल इथल्या फॅक्टरीमध्ये काम करत असल्याचं सांगितलं.  मात्र पोलिसांनी खोदून खोदून प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर या दोघांची घाबरगुंडी उडाली.   त्यांची उत्तरं सतत बदलत असल्याचं पाहिल्यानंतर पोलिसांना हे दोघेजण काहीतरी गडबड करत असावेत असा संशय आला. यामुळे पोलिसांनी या दोघांची झडती घेतली. झडतीमध्ये त्यांना या दोघांकडे क्रीम बिस्कीटांचे 3 पुडे सापडले. तपासादरम्यान या बिस्कीटांमध्ये त्यांनी गुंगीचे औषध मिसळले असल्याचं कळालं.

गेल्या काही दिवसांमध्ये कुर्ला टिळक टर्मिसनवर प्रवाशांना लुटल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पटेल आणि प्रसाद यांच्या अटकेनंतर आरपीएफचे टिळक टर्मिनस येथील रेल्वे पोलीस अधिकारी नरेश सावंत यांनी सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासायला सुरुवात केली होती. या दृश्यांद्वारे संशयास्पद हालचाली टीपण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघे आरोपी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांशी रिझर्वेशन करतेवेळी जवळीक साधायचे. त्यांना चहा पाजण्याच्या बहाण्याने घेऊन जायचे आणि त्यांना चहासोबत बिस्कीट खायला घालायचे. बिस्कीटं खाल्ल्यानंतर प्रवासी बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या जवळ असलेला सगळा माल लुटून दोघे फरार व्हायचे.