रस्ता सुरक्षा अभियानात दोन लाखांची दंडवसूली

12
प्रतिकात्मक छायाचित्र


सामना प्रतिनिधी । नगर

वाहनधारकांमध्ये जनजागृतीसाठी राबविले जाणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानात मोठ्या प्रमाणात दंडवसूली झाली आहे. शहर वाहतूक शाखेच्या विभागाने रस्तासुरक्षा अभियान 4 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान राबविले होते. त्यामध्ये सुमारे 674 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत वाहनधारकांकडून 2 लाख 7 हजार 500 रूपयांचा दंड वसूल झाला आहे. वाहतूक शाखेकडून जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाई करण्यात आली. अवघ्या सहा दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे रस्ता सुरक्षा अभियान 4 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याहस्ते सुरू करण्यात आले. शहरातील एसपी चौक, चांदणी चौक, पत्रकार चौकासह शहरातील विविध प्रमुख रस्त्यांवर पोलिसांनी वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कारवाई केली. हेल्मेट, सीटबेल्ट नसणे, दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणे, वाहन चालविताना मोबाईल वापरणे, लायसन्स नसणे, गाडीची कागदपत्रे नसणे, बिगर नंबरची वाहने, काळ्या काचा असणार्‍या वाहनांवर रस्ता सुरक्षा अभियानात कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे दोन लाखांची दंडवसुली झाली आहे.

गेल्या सहा दिवसांत रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानात वाहतूक शाखेने विविध उपक्रम राबविले. शहरातून दुचाकी रॅली काढून प्रबोधन केले, नियम पाळणार्‍या वाहनधारकांचे स्वागत केले. आर्मी स्कूल, भिंगार स्कूलसह विविध शाळांमध्ये वाहतूक नियमांचे प्रबोधन केले. लायन्स क्लब, रोटरी क्लबच्यावतीने रस्त्यावर ‘यमराज’चा पेहराव करून वाहनधारकांना वाहतूक नियम समजावण्यात आले. इलेक्ट्रीक दुचाक्यांची रॅली काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. परंतु प्रबोधन व दंडात्मक कारवाई करूनही नियम पाळण्याबाबत वाहनधारकांमध्ये उदासीनता दिसून आली. यापुढेही अशी कारवाई सुरूच ठेवणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या