हिंगोली जिल्ह्यात भीषण दुष्काळ, 2 हजार कुटुंबांचे स्थलांतर

206

सामना प्रतिनिधी, हिंगोली

साल 2016 चा अपवाद वगळता मागील 5 वर्षापासून सातत्याने घटलेले पर्जन्यमान व आटलेल्या जलस्रोतांमुळे यंदाच्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना हिंगोली जिल्ह्याला करावा लागत असून जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधु नदी कोरडीठाक पडली आहे. ईसापुर, येलदरी आणि सिध्देश्वर या तीन प्रमुख सिंचन प्रकल्पात फक्त आठ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून पावसाने ओढ दिली तर जुनमध्ये पाण्यासाठी हिंगोली जिल्हावासीय व मुक्या जनावरांची तडफड होणार आहे. जिल्ह्यात 449 विंधन विहीर व विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले असून 55 टँकरद्वारे 40 गावांना पाणी पुरवठा सुरु आहे. तसेच पाचशेच्यावर खासगी टँकरच्या माध्यमातून दररोज पाणी खरेदी-विक्रीच्या व्यवसायातून 7 लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचे सुत्रांनी सांगितले. तर हाताला काम नसल्यामुळे पाचही तालुक्यातील 2 हजाराच्यावर कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या पाच तालुक्यात एकूण 711 गावे, वाडी-तांडे आहेत. या 711 पैकी चारशेच्यावर ठिकाणी पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. मागिल पाच वर्षात जिल्ह्यात झालेल्या पावसाचा विचार केला तर 2014 मध्ये वार्षिक सरासरीच्या तुलनेत 52.22 टक्के, 2015 मध्ये 64.25 टक्के, 2016 ला 104.93 टक्के, 2017 ला 73.18 टक्के आणि 2018 मध्ये 75.08 टक्के पाऊस झाला आहे. 2016 या एक वर्षाचा अपवाद वगळता पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली. तसेच दीड ते साडे तीन मीटरपर्यंत जिल्हाभरात पाण्याची पातळी खोल गेली आहे. सार्वजनिक व खासगी विंधन विहीरी तसेच विहीरींची संख्या 20 हजाराच्यावर असून यापैकी 40 टक्के जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत. तर उर्वरित जलस्रोतांपैकी 20 टक्के विहीरी व विंधन विहीरींनी तळ गाठला असून अर्धा दिवस पुरेल एवढेच पाणी नागरिकांना मिळते. 2018 या वर्षात 23 गावांना 21 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता.

यंदाच्या वर्षी 40 गावांना 55 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून शंभरच्यावर गावांची टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे. टँकरची वाढलेली संख्या व मागणी हेच भिषण दुष्काळ व पाणी टंचाईसाठी पुरेसे असलेले बोलके चित्र आहे. हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधु नदी कोरडीठक पडली असून हिंगोलीजवळ साचलेले गटाराचे पाणी या व्यतिरिक्त नदीचे पात्र पुर्णत: कोरडे आहे. सेनगाव ते कळमनुरी पर्यंत व्हाया हिंगोली कयाधुचे कोरडे पात्र दिसुन येत आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी येलदरी, सिध्देश्वर आणि ईसापुर हे तीन सिंचन प्रकल्प महत्वाचे आहेत. हिंगोली, कळमनुरी व वसमत या शहरांची तहान ईसापुर व सिध्देश्वरच्या पाण्यातुन भागविली जाते. येलदरी व सिध्देश्वरमध्ये जीवंत पाणीसाठा शुन्य टक्के असून मृतसाठा अनुक्रमे 82.02 व 77.19 टक्के आहे. तर 1279.0594 दलघमी पाणीसाठा क्षमता असलेल्या ईसापुर धरणात फक्त 8.61 टक्के पाणी जीवत पाणीसाठा उपलब्ध आहे. जिल्हाभरातील पाझर तलाव, गाव तलाव, सिंचन तलाव देखील आटले असून 4 तलाव कोरडेठक पडले आहेत. तर जोत्याखाली पाणी पातळी गेलेल्या तलावाची संख्या 18 ईतकी झाली आहे. 12 तलावांमध्ये 5 ते 15 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. टँकरद्वारे गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शासन व प्रशासनाच्या माध्यमातुन 55 टँकर जिल्ह्यात सुरु असले तरीही खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी विक्रीचा व्यवसाय तेजीत आहे. हिंगोली शहराच्या जवळची उपनगरे व शहराच्या काही भागात तसेच ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाचशेच्यावर खासगी टँकर चालक पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. शंभर ते पाचशे लिटर पाण्याची टाकी वाहनावर लाऊन पाणी पुरवठा केला जात असून शहरामध्ये दोनशे ते अडीचशे रुपये तर ग्रामीण भागात दोनशे रुपये दर आकारला जात आहे. या माध्यमातून सात लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे. तसेच बैलगाडीवर पाण्याची टाकी ठेवून पाणी आणावे लागत असून शंभरच्यावर गावात 2 ते 3 कि.मी. ची पायपीट करून महिला व नागरिकांना पिण्याचे व वापराचे पाणी आणावे लागत आहे. जिल्ह्यामध्ये एकीकडे नागरिकांची ही अवस्था असतांना पशुधन व मुक्या जनावरांना चारा व पाणी मिळत नसल्याचे भिषण वास्तव आहे. यामुळेच कवडीमोल भावात पशुधनाची विक्री शेतकरी व पशुपालक करत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार दररोज 1 हजार 946 मेट्रीक टन चाऱ्याची आवश्यकता असून 143 दिवस पुरेल ईतका चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. हिंगोली जिल्ह्यात सिंचन विहीरी वगळता रोजगार हमी योजनेची कामे फारशी सुरू नाहीत. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे मजुरांच्या हाताला शेतीची कामेही मिळत नसल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. यामुळे कळमनुरी, हिंगोली, सेनगाव, वसमत, औंढा नागनाथ या पाचही तालुक्यातील 2 हजाराच्यावर कुटुंबांनी कामाच्या शोधासाठी शहरे जवळ केली आहेत. जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेकडुन टंचाई उपाययोजने संदर्भात आवश्यक ते प्रयत्न केले जात आहेत. मात्र, जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली पाणी टंचाई व पडलेला दुष्काळ जलयुक्त शिवार योजनेचा फोलपणा समोर आणणारा ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या