मालवणातील रस्त्यांसाठी 20 कोटींचा निधी मंजूर, आमदर वैभव नाईक यांची माहिती

सामना प्रतिनिधीमालवण 

मालवण तालुक्यातील खड्डेमय बनलेल्या प्रमुख रस्त्यांसाठी विशेष दुरुस्ती अंतर्गत सुमारे २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आगामी आचारसंहिता लक्षात घेता या कामांची निविदा प्रक्रियाही तात्काळ सुरू करण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी यापूर्वी कोट्यावधीचा निधी उपलब्ध झाला. आता मंजूर झालेल्या निधीतून सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

दरम्यान, ज्या असरोंडी-शिरवडे रस्त्यासाठी स्वाभिमान पक्षाच्या वतीने १४ फेब्रुवारीला उपोषणाची स्टंटबाजी केली त्या रस्त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्यातून २ कोटी ३४ लाखाचा निधी उपोषणा पूर्वीच मंजूर झाला. त्या कामाची निविदा प्रक्रिया १३ फेब्रुवारीपासूनच सुरू झाली. त्यामुळे स्वाभिमान पक्षाच्या स्टंटबाजीला जनता योग्यवेळी उत्तर देईल, असा टोला आमदार नाईक यांनी लगावला.

मालवण तालुका शिवसेना कार्यलयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार नाईक बोलत होते.  कणकवली-आचरा या रस्त्यासाठी २ कोटी निधीतून काम सुरू झाले आहे. तर उर्वरित कामासाठी ८ कोटी निधी मंजूर झाला आहे. मालवण-कसाल रस्त्यासाठी ४ कोटी ९२ लाख, चौके-धामापूर रस्त्यासाठी ३ कोटी ९८ लाख तर मालवण शहरातील रस्त्यासाठी २ कोटी १५ लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या सर्व कामांसाठी गेले काही महिने सतत पाठपुरावा सुरू होता. त्यातूनच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री दीपक केसरकर व खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर केला. व त्याची निविदा प्रक्रियाही तात्काळ सुरू झाली आहे.

सिंधुदुर्गातील निनावी ठेकेदारी मोडीत 

ई-निविदा प्रक्रिया व स्पर्धात्मक ठेकेदारीमुळे गेले काही वर्षे सिंधुदुर्गात सुरू असलेली निनावी ठेकेदारी मोडीत निघाली आहे. ठेकेदारांची संघटना निर्माण करून कामे अडवून ठेवण्याच्या वृत्तीलाही चाप बसला आहे. इ निविदेमुळे अनेक ठेकेदार पुढे येत असून जनतेची सार्वजनिक विकासकामे दर्जात्मक पद्धतीने होत आहेत. असे असताना स्वाभिमानची ठेकेदार नेतेमंडळी आम्ही मंजूर केलेल्या विकासकामांची भूमिपूजन करून करत आहेत. कणकवलीच्या आमदारांना येथे येऊन भूमिपूजने करावी लागतात हीच आमच्या कामाची पोचपावती आहे. असे असताना आम्ही दर्जेदार काम करतो असे सांगणाऱ्या स्वाभिमानच्या ठेकेदाराने काही वर्षांपूर्वी बांधलेल्या गोळवण प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाळ्यात सुरू असलेली गळती तपासून आपल्या कामाचा दर्जा तपासावा, असा टोला आमदार नाईक यांनी लगावला.

बसस्थानक भूमिपूजन व वीज उपकेंद्राचे उदघाटन चार दिवसात 

मालवण शहरातील बस स्थानक ठिकाणी अद्यावत असे नवे बस स्थानक मंजूर झाले आहे. या बस स्थानकाचे भूमिपूजन चार दिवसात केले जाणार आहे. तर मालवण शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या वीज उपकेंद्राचे उद्घाटनही चार दिवसात केले जाणार आहे. अशी माहितीही आमदार वैभव नाईक यांनी दिली.