२० ग्रहांवर मानवी वस्तीसाठी पोषक वातावरण, नासाचा दावा

सामना ऑनलाईन। वॉशिंग्टन

ब्रह्मांडांतील रहस्यांचा मागोवा घेणाऱ्या शास्त्रज्ञांनी सूर्यमालेबाहेर २० ग्रह अस्तित्वात असल्याचा दावा केला असून यातील काही ग्रहांवरील वातावरण आणि पृथ्वीवरील वातावरण यात साम्य असल्याचे म्हटले आहे. यामुळे या ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सूर्यमालेबाहेरील रहस्य शोधण्यासाठी नासाच्या शास्त्रज्ञांनी केप्लर ही मोहीम राबवली होती. या मोहिमेतंर्गत हे २० ग्रह सापडल्याचे नासाने म्हटले आहे.
या २० ग्रहांपैकी काही ग्रहांवरचे तापमान पृथ्वीशी मिळते जुळते असून या ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या ग्रहांचा ७० ते ८० टक्के पृष्ठभाग घन स्वरुपाचा असल्याचेही शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

नासाच्या k2 मोहिमेतील शास्त्रज्ञ जेफ कॅगलिन यांनी केपलर मोहिमेतंगर्त ग्रहांचा शोध घेण्याचा हा दुसरा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे. तसेच यातील काही ग्रह सूर्यापासून दूर असल्याने ते टुंड्रा प्रदेशसारखे बर्फाच्छादीत आहेत तर काही ग्रहांवर उकळते पाणी असण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.