नववीचे २० टक्के विद्यार्थी नापास

सामना प्रतिनिधी । मुंबई

20 गुणांची तोंडी आणि 80 गुणांची लेखी परीक्षा हा आतापर्यंतचा पेपर पॅटर्न बदलून नववीच्या विद्यार्थ्यांची यंदा 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. पण हा बदल विद्यार्थ्यांना फारसा मानवलेला नाही. कारण नुकत्याच झालेल्या सहामाही परीक्षेच्या निकालात नववीच्या सुमारे 20 टक्के विद्यार्थ्यांची दांडी गुल झाली आहे.

तोंडी परीक्षांचे गुण शाळांच्या हाती असल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत होते. काही शाळा तर निकाल वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण देत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तोंडी परीक्षा बंद करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेचा सराव व्हावा, यासाठी यंदा नववीपासूनच हा बदल करण्यात आला. पुढील वर्षापासून दहावीची तोंडी परीक्षा होणार नाही. तोंडी परीक्षा नसल्याने विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण घटले आहे. जे विद्यार्थी अभ्यासात मागे आहेत. त्यांच्यावर विशेष परिश्रम घेण्यासाठी शिक्षण विभाग जलद प्रगत शिक्षण हा कार्यक्रम राबवीत आहे.

या कारणांमुळे विद्यार्थ्यांची पीछेहाट

आठवीपर्यंत नापास होण्याची भीती नसल्याने विद्यार्थी परीक्षांचे टेन्शन घेत नव्हते. मात्र नववीत आल्यावर विद्यार्थ्यांना थेट 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागत आहे.

पूर्वी 80 गुणांच्या पेपरसाठी तीन तासांचा कालावधी होता. आता 100 गुणांच्या पेपरसाठीही तेवढाच वेळ आहे.

समाजशास्त्र विषयात पूर्वी 40 गुण इतिहास-राज्यशास्त्र, 40 गुण भूगोल-अर्थशास्त्र आणि 20 गुण स्वाध्याय पुस्तिकेसाठी होते. मात्र आता गुणांची विभागणी 60 गुण इतिहास-राज्यशास्त्र, 40 गुण भूगोल-अर्थशास्त्र अशी झाली असून स्वाध्याय पुस्तिकेचे हातचे 20 गुण आता विद्यार्थ्यांना मिळत नाहीत.

विज्ञान परीक्षा पद्धतीत बदल झालेला नाही. मात्र गणिताचे स्वाध्याय पुस्तिकेचे 20 गुण बंद करून 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागत आहे.

काठावर पास होणाऱयांना फटका

तोंडी परीक्षा बंद झाल्याचा सर्वाधिक फटका काठावर पास होणाऱया विद्यार्थ्यांना बसला आहे. भाषा विषयांची तोंडी परीक्षा झाली नाही. त्यातच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये कृतिपत्रिका सोडवायची आहे. यात विचार करून, कल्पनाशक्तीच्या जोरावर उत्तर लिहायचे असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांना भाषेचा पेपर जड जात आहे. जे विद्यार्थी 90 च्यावर गुण मिळवितात त्यांच्या टक्केवारीत एक ते दोन टक्क्यांची घसरण पाहायला मिळत आहे. तसेच 80 च्या घरात गुण मिळविणाऱया विद्यार्थ्यांना 75 टक्क्यांवर मजल मारता आल्याचे कुलाबा महापालिका माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अंबरसिंग मगर यांनी सांगितले.