देशातील २० टक्के महिला लठ्ठ

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशभरातील महिलांमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढले असून देशातील २० टक्के महिला लठ्ठ आहेत. योग्यवेळी यावर नियंत्रण न मिळवल्यास येत्या काळात महिलांमधला लठ्ठपणा ही देशातील गंभीर समस्य़ा ठरु शकते. अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण अहवालात देण्यात आली आहे.

या माहितीनुसार देशात १५ ते ४९ या वयोमर्य़ादेतील एकूण २०.७ ट्कके महिला लठ्ठ आहेत. ग्रामीण महिलांच्या तुलनेत शहरातील महिलांमध्ये स्थूलपणाची समस्या वाढत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २००५-६ च्या तुलनेत या आकड्यात ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पुरुषांच्या वजनाच्या तुलनेत महिलांमध्ये झपाट्याने वजन वाढत आहे. ही चिंताजनक बाब आहे. वजन वाढण्यामागे निरनिराळी कारणे असली तरी व्यायामाची कमतरता, ताण, हार्मोन्समधील बदल, खाण्यापिण्याच्या अनिश्चित वेळा ही यामागची महत्वाची कारणे असल्याचे या अहवालात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २००५-२००६ मध्ये केलेल्या आरोग्य तपासणीच्या तुलनेत ही वाढ अधिक आहे. दरम्यान  महिलांच्या वजनात वाढ होण्याचे प्रमाण वाढले असले तरी पुरुषांनीही खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

वेळीच वजनावर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात देशातील वजनदार महिला आणि पुरुषांना  ह्रद्यविकार ,स्ट्रोक, मधुमेह, श्वसनाचे विकार, हाडे ठिसूळ होणे, गुडघेदुखी अशा अनेक आजारांचा  सामना करावा लागेल. असा इशारा राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षण अहवालात देण्यात आला आहे.