कानडी पोलिसांनी जनरल डायरलाही लाजवले! मोर्चावर तुटूनपडले
बेळगावात मराठी बांधवांवर अमानुष लाठीहल्ला, डोकी फोडली
कोल्हापूर, दि. 12 (सा. वा.) - बेळगाव, गुलबर्गा कर्नाटकचेच असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करणार्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज काढण्यात आलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मोर्चावर कर्नाटक पोलिसांनी अमानुष लाठीमार करीत मोर्चा चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. मराठी बांधवांवर लाठ्या चालविताना कानडी पोलिसांनी जनरल डायरलाही लाजविले. शांततेत चाललेल्या मोर्चातील तरुणांसह वृद्धांवरही हल्ला करीत डोकी फोडली आणि सीमावासीयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला. ‘कन्नड रक्षक वेदिका’च्या कायर्र्कर्त्यांनी मोर्चा उधळण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोर्चेकर्यांवर लाठ्या चालविताना कानडी पोलिसांनी जनरल डायरलाही लाजविले. शांततेत चाललेल्या मोर्चातील तरुणांसह वृद्धांवरही पोलिसांनी हल्ला करीत डोकी फोडली आणि सीमावासीयांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.
बेळगाव-गुलबर्गासह सीमाभागातील मराठी भाषक मुलुख कर्नाटकचाच असल्याचे शपथपत्र केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात सादर केले आणि महाराष्ट्रासह सीमाभागात संतापाची लाट उसळली. संतापलेल्या सीमावासीयांनी केंद्राच्या निषेधासाठी आज प्रचंड मोर्चा काढून मराठी एकजुटीची वज्रमूठ आवळली. हाताला काळे कापड, निषेधाचे फलक, काळे झेंडे आणि धिक्काराच्या घोषणा देत केंद्र व कर्नाटक सरकारविरोधात आपली तीक्र नाराजी सीमाबांधवांनी व्यक्त केली.
दरम्यान, भगवे ध्वज घेऊन ‘जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देत मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या तरुणांची आणि महिलांची संख्या पाहून कर्नाटक प्रशासन चांगलेच हादरल्याचे दिसून आले. प्रचंड पोलीस बंदोबस्त असतानाही महाराष्ट्रात येण्यासाठी धडपडणार्या या मराठी बांधवांनी न्यायालयाच्या आवारातील ‘कन्नड रक्षक वेदिका’चा ध्वज उतरवून तेथे भगवा ध्वज फडकवला. त्यामुळे कर्नाटकी पोलिसांनी मराठी बांधवांवर लाठीचार्ज केला. यामध्ये कित्येकजण जखमी झाले.
कर्नाटक पोलिसांनी बेछूट लाठीमार करताना वृद्धांचीही गय केली नाही. 70 वर्षांचे भुजंग भरमू पाटील, जोतिबा लंगरकोडे (वय 62), शिवाजी बहिर्जी शिरोळकर (वय 73), एस. एस. घोडेकर (वय 78) यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तर, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, के. एल. मन्नोळकर, गजानन चौगुले, खाचू मन्नोळकर, रुकमण्णा कोवाडकर, पी. के. तरळे, जोतिबा पाटील, अमर कुरणे, नामदेव रणदिवे, भावेश बिर्जे, मिलिंद खांडेकर यांना मारहाण करण्यात आली. काहींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तर काहींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीत महिलाही जखमी झाल्या. लाठीमाराचे आदेश कोणी दिले याबाबत जिल्हा पोलीसप्रमुख सोनिया नारंग यांनी कानावर हात ठेवले.
छत्रपती संभाजी महाराज चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करून ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में’, ‘मराठी एकजुटीचा विजय असो’ अशा सळसळत्या घोषणा देत, तसेच केंद्र आणि कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत हा सुमारे 15 ते 20 हजारांहून अधिक असलेला मराठी भाषक बांधवांचा मोर्चा कॉलेज रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चाच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष, माजी आमदार वसंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी एकरूप कौर यांना मराठी बांधवांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच मोर्चाचे रूपांतर निषेधसभेत झाले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी सीमाबांधवांचा इतिहास उभा करताना, आता न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी आपण सज्ज आहोत, असे सांगितले. नुकताच केंद्र आणि कर्नाटक सरकारचा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारने सादर केलेला अंतरिम सुधारणा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतल्याचे सांगताना एन. डी. पाटील यांनी, आता प्रसिद्ध वकील हरीश साळवे हे आपली बाजू मांडण्यासाठी सक्षम असून, आपल्याला प्रदीर्घ काळाने का होईना, पण न्याय मिळणारच, अशी खात्री व्यक्त केली. तसेच, सभेच्या सुरुवातीस कर्नाटकी पोलिसांनी मराठी बांधवांवर केलेल्या लाठीहल्ल्याचाही डॉ. एन. डी. पाटील यांनी तीक्र निषेध केला.
यावेळी म. ए. समितीचे अध्यक्ष व माजी आमदार वसंतराव पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, माजी आमदार दिगंबर पाटील, अर्जुनराव हिशोबकर, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, म. ए. समितीचे शहर अध्यक्ष दीपक दळवी, समितीचे तालुका अध्यक्ष लिंगोजीराव हुद्दार, खानापूर तालुका अध्यक्ष विलास बेळगावकर, संभाजी पाटील, संजय पाटील, रामकृष्ण मोदगीकर, प्रकाश शिरोळकर, माजी आमदार मनोहर कडोळकर यांच्यासह ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेतील आजी-माजी मराठी भाषक सदस्य, म. ए. समितीचे पदाधिकारी आणि सीमाभागातील मराठी भाषक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सीमाभागात मराठी भाषक बहुसंख्य असतानाही कर्नाटक सरकारने त्यांना अल्पसंख्याक ठरविले आहे. मराठी भाषकांना त्यांचे अधिकार मिळावेत, जमीन, जन्म-मृत्यू नोंदणी, शैक्षणिक प्रक्रियेत, तसेच बसच्या नावांमध्येही मराठी भाषेला प्राधान्य द्यावे, कानडीकरण करून मराठी भाषकांवर अत्याचार करू नयेत आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.