|
नवी दिल्ली, दि. ४ (प्रतिनिधी) - काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या अक्राळविक्राळ प्रश्नावर उपोषणाची घोषणा करून कॉंग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांना आपल्या नाकदुर्या काढायला लावणारे ‘योगगुरू’ रामदेवबाबा यांना आज केंद्र सरकारने जबरदस्त धोबीपछाड दिला. बाबांचे आजपासून नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर सुरू झालेले उपोषण हे सरकारशी संगनमताने केलेले ‘प्रिमियर लीग’चे ‘फिक्सिंग’ होते, याचा पर्दाफाश आज झाला. सरकारने लेखी आश्वासन देताच उपोषण पहिल्यादिवशीच संपवू, असे लेखी अभिवचन रामदेवबाबा यांनी दिल्याचे उघड झाले आहे. तसेच मंजूर मागण्यांबाबत त्यांनी अध्यादेशाचा आग्रह न धरता सरकारकडून लेखी आश्वासनावर समाधान मानण्याची घेतलेली भूमिकाही ‘फिक्सिंग’ची निर्दशक ठरली आहे. सरकारच्या आश्वासनानंतर आपण शनिवारीच उपोषण समाप्त करू, असे लेखी वचन रामदेवबाबांनी दिले होते, असे सांगून सिब्बल यांनी ते पत्रच फडकावले. त्यामुळे ‘योगगुरू’ची आता चांगलीच गोची झाली आहे. * काळ्या पैशाबाबतचा अहवाल येत्या सहा महिन्यांत तयार करून जाहीर केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी आज केली. त्याआधी सरकारने रामदेवबाबा यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. * कपिल सिब्बल खोटारडे सरकारने जाहीर केलेले ‘ते’ पत्र आचार्य बालकृष्ण यांनी लिहिलेले असून ते पंतप्रधानांना देण्यासाठी होते, असा खुलासा रामदेवबाबांनी केला आहे. केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे खोटारडे असून केंद्र सरकारने माझ्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. सिब्बल यांनी विश्वासघात केला असून त्यांच्यासोबत यापुढे आयुष्यात कधीच बोलणार नाही, असेही रामदेवबाबा यांनी रामलीला मैदानावर जाहीर केले. * रामदेवबाबा यांच्या मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी दीर्घ चर्चा झाली होती. त्यांच्या मागण्यांबाबत येत्या दोन दिवसांत लिखित आश्वासन दिले जाईल, असे सरकारतर्फे त्या बैठकीत सांगण्यात आले होते. त्यानुसार आपण शनिवारी सकाळी उपोषण समाप्तीची घोषणा करू, असे लेखी आश्वासन बाबा रामदेव यांनी सरकारला दिले होते. पण बाबांनी कालपासून त्याबाबत गुप्तता पाळली होती. बाबांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार हे उपोषण शनिवारी संपवायला हवे होते. त्याची आठवण करून देण्यासाठी आपण आज सकाळपासून त्यांना फोन करत होतो, पण बाबा फोनच उचलत नव्हते.- कपिल सिब्बल, केंद्रिय मनुष्यबळ विकासमंत्री
|
|
|
|