|
खाऊ का?
बृस्केता टोस्ट (इटालियन अपेटायझर)
बृस्केता टोस्ट एक पौष्टिक, साधा, सोपा, पण स्टायलिश पदार्थ आहे. आता जसा उन्हाळा वाढत जाणार तसं आपल्याला शेगडीपाशी कमीतकमी उभं राहावंसं वाटणार. त्यातून परत वर्ल्ड कपच्या निमित्ताने मित्रमंडळी पण एकत्र होणार. तेव्हा हा पदार्थ उपयुक्त ठरेल. असं यात काय विशेष आहे? टोमॅटो, लसूण आणि ऑलिव्ह ऑइल. भरपूर टोमॅटो असल्याने त्यातले ऍण्टी ऑक्सिडन्ट लाय्कोपीन, जीवनसत्त्व अ, ई आणि क, भरपूर फायबर आणि पोटॅशियम (याने रक्तचाप संतुलित ठेवायला मदत होते) या सगळ्याचे गुण आपल्याला मिळतात. शिवाय हा पदार्थ लो कॅल., लो सोडियम, लो फॅट पण आहे. आता अजून किती निमित्तं हवीयेत हे करून बघायला? हे घ्या- अशा ४ टोस्टमधून आपल्याला फक्त २०० कॅलरी, ५ ग्रॅम फॅट आणि साधारण ५ ग्रॅम प्रोटीन मिळतील.
सामग्री :
४ स्लाईस मल्टिग्रेन किंवा होल व्हीट ब्रेड
४ टोमॅटो बारीक चिरलेले
४ किसलेल्या लसूण पाकळ्या
१ चमचा ऑलिव्ह ऑइल
१ चमचा ऑरेगानो किंवा बेसिल (पिझ्झाबरोबर पाकीट मिळतं ते)
हवं असल्यास अगदी थोडं चीज,
मीठ आणि मिरीपूड चवीनुसार
कृती :
ओव्हन १८० डिग्री प्री-हिट करून ठेवा. यासाठी टोस्ट मोड (वरच्या आणि खालच्या दोन्ही रॉडला गरम करणारा मोड)चा वापर करा.
एका बेकिंग ट्रेमधे ब्रेडचा स्लाईस पसरून ठेवा. प्रत्येक स्लाईसवर चिरलेला टोमॅटो (भरपूर प्रमाणात) घाला. त्यावर किसलेला लसूण, ऑरेगानो, मीठ आणि मिरीपूड घाला. १-२ थेंब ऑलिव्ह ऑइल घाला. हे ऑइल फक्त स्वाद वाढवण्यासाठी आहे. नसेल तर वगळलं तरी चालेल. सजावटीसाठी, एक बारीक तुकडा चीज, स्लाईसवर ठेवा.
हा ट्रे ओव्हनमध्ये साधारण १० मिनिटे ठेवा. ब्रेड टोस्ट होऊन कुरकुरीत झाला पाहिजे. टोमॅटो साधारण वाफवल्यासारखे दिसतील.
घरी ओव्हन नसेल तरी हा पदार्थ करता येतो. बेकिंग ट्रेच्या ऐवजी एका नॉनस्टिक पॅनमध्ये त्या ब्रेडच्या स्लाईसवर दिल्याप्रमाणे तयार करून घेणे. मग हे पॅन मंद आचेवर झाकून ठेवून ब्रेड खमंग भाजला जाईपर्यंत ठेवा. गरमागरम बृस्केता टोस्ट पेश करा!
- अमिता गद्रे-केळकर
(ंलेखिका डाएट कन्सल्टंट आहेत)
amitagadre@gmail.com
|
|