|
विरोधकांच्या सातशे पिढ्या
उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरचा भगवा उतरु देणार नाही
उद्धव ठाकरे यांनी फुंकली विजयाची तुतारी
२५ हजार गटप्रमुखांचा विराट मेळावा
 
गोरेगाव येथील नेस्को संकुल
येथे मंगळवारी झालेल्या शिवसेना गटप्रमुखांच्या विराट मेळाव्याला मार्गदर्शन
करताना शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर केवळ भगवा
आणि भगवाच फडकेल अशी गर्जना केली.
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) - ‘मुंबई महापालिका निवडणूक म्हणजे लोकशाहीतील एक
युद्धच आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सारे विरोधक भगवा उतरवण्यासाठी टपून बसले
आहेत. पण शिवसेनेकडे जीवाला जीव देणारा आणि अफझलखानाचं थडगं बांधणार्या
शिवरायांच्या मावळ्यासारखा शिवसैनिक आहे. त्यांची साथ असेपर्यंत विरोधकांच्या
सातशे पिढ्या उतरल्या तरी मुंबईवरचा भगवा उतरू देणार नाही,’ अशी जबरदस्त
गर्जना करीत शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विजयाची तुतारी फुंकली.
गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे झालेल्या शिवसेनेच्या २५ हजार गटप्रमुखांच्या
विराट मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवसैनिकांची निष्ठा,
मेहनतीचे कौतुक करताना आणि मुंबईत शिवसेनेने केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा
मांडत उद्धव ठाकरे यांनी आपल्या तडाखेबंद भाषणात विरोधकांना अक्षरश: झोडपून
काढले.
केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवायची असतील तर डंका पिटलाच पाहिजे. अनेकांना
स्वत:चं सोडून शेजारच्याच घरात डोकावायची सवय असते. त्यांना विकास दिसतच नाही
म्हणून होर्डिंग्ज लावावी लागतात. जो मुंबईचा विकास मानायला तयार नाही तो इथे
राहायला नालायक आहे,’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
संकटावर मात करून मुंबईचा विकास केला
‘मुंबई महापालिकेची सत्ता आमच्याकडे आहे. पण ना केंद्र सरकारचा पाठिंबा आहे
ना राज्य सरकारचा. केंद्र सरकार मुंबईकडे फक्त सोन्याची कोंबडी म्हणून पाहते.
मुंबईतून हजारो कोटी जातात, पण येत काहीच नाही. एकीकडे ही परिस्थिती. दुसरीकडे
२००५ मध्ये पूर आला. नंतर मलेरिया उपटला. या सगळ्या संकटांचा मुकाबला करत
आम्ही मुंबईत विकासकामे केली. सगळीच कामे झालीत असा आमचा दावा नाही. पण कामं
झाली आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही, असे ते म्हणाले.
थू तुमच्या जिंदगानीवर
‘शिवरायांवर चालून आलेल्या अफझलखानाला मराठ्यांचे अनेक सगेसोयरे सामील झाले.
जहागिरी मिळविली. भगवा बुडाला तरी चालेल जहागिरी वाचली पाहिजे असा विचार
करणारी ती अवलाद आजही आहे. थू तुमच्या जिंदगानीवर’ असा संताप उद्धव ठाकरे
यांनी व्यक्त केला.
राक्षसी महत्त्वाकांक्षा बाळगू नका
‘शिवसेनेत गटप्रमुख असला तरी गटबाजी नाही. पण आगी लावण्याचा, मनं फोडण्याचा
कॉंग्रेसवाल्यांचा धंदा आहे. कॉंग्रेसवाले ‘शोले’मधल्या गब्बरसिंगसारखे आहेत.
त्यांच्यापासून सावध रहा, असे सांगून, ‘महत्त्वाकांक्षा प्रत्येकालाच असते.
पण या महत्त्वाकांक्षेला राक्षसी रूप येऊ देऊ नका. अन्यथा त्याचा फायदा
कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाले उचलतील आणि डोक्यावर बसतील,’ असा इशाराही उद्धव
ठाकरे यांनी यावेळी दिला.
शिवसेनाप्रमुखांनी सामान्य माणूस उभा केला
शिवसेनाप्रमुखांनी किती संस्था उभारल्या असे विचारणार्या अजित पवार यांना
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनाप्रमुखांनी संस्था उभी केली नसेल पण सामान्य
माणूस उभा केला. तुमच्या बापजाद्यांनाही ते जमले नाही.’
शिवसेना नेते खासदार मनोहर जोशी, विधिमंडळ पक्षनेते सुभाष देसाई, शिवसेना नेते
आमदार रामदास कदम, महापौर श्रद्धा जाधव यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेना
कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंबईचे विकासपुरुष या उपाधीने सन्मानित करणारे
मानपत्र शिवसेना नेते आमदार सुभाष देसाई यांच्या हस्ते देण्यात आले.
शिवसेना-भाजप युतीने केलेल्या विकासकामांची माहिती देणार्या ‘करून दाखवलं’
या विकासनाम्याचे पुस्तक व ध्वनिचित्रफितीचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या
हस्ते यावेळी करण्यात आले. यावेळी ‘करून दाखवलं’ या संकल्पनेसाठी संजय सुरे
यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी महापौर श्रद्धा
जाधव यांच्या कार्यअहवालाचेही प्रकाशन करण्यात आले.
युवा सेनेच्या संकल्पनेतून बनविण्यात आलेले ‘मुंबईसाठी शिवसेना पाहिजे’ हे
गीत यावेळी सादर करण्यात आले. या गीताचे संगीतकार सिद्धार्थ शंकर महादेवन,
सौमिल शृंगारपुरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुधीर जोशी, ऍड. लीलाधर
डाके, दत्ताजी नलावडे, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते, गजानन कीर्तीकर, अनंत
गीते, सौ. रश्मी ठाकरे, उपनेते विनोद घोसाळकर, पालिका सभागृह नेते सुनील प्रभू,
स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे, सचिव विनायक राऊत, अनिल देसाई, दिवाकर
बोरकर, आदेश बांदेकर उपस्थित होते.
सीमाबांधव मतदार नाहीत म्हणूनच...
सीमाप्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘बेळगावसह सीमा भागात मराठी माणूस
वर्षानुवर्षे राहत आहे. मराठी माणसे कर्नाटकात गेलेली नाहीत. तो भाग
कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. म्हणून संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून
संपलेला नाही. पण तेथील लोकांची मते मुंबई महापालिका निवडणुकीत मिळणार नाहीत
मग ‘मरा तिकडे’ असा ढोंगीपणा काहीजणांनी चालवला आहे. संयुक्त महाराष्ट्राचं
दालन बघा बेळगाव महाराष्ट्रात का पाहिजे हे कळेल. शिवसेनाप्रमुखांनी त्यासाठी
तुरुंगवास भोगला आहे. त्यावेळी गोधडी ओली करणार्यांना बेळगावकरांच्या वेदना
काय कळणार?’
होय, करून दाखवलंच!
शिवसेनेच्या ‘करून दाखवलंच’ या जाहिरातींवर टीका करणार्या टिकोजीरावांचा
समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शिवसेनेच्या कामांची होर्डिंग्ज बघून
अनेकांच्या पोटात मुरडा पडला आहे. पण त्याला आमचा नाइलाज आहे. कारण आम्ही
फक्त शब्दांचे बुडबुडे फोडत नाही. करून दाखवतो. होय, करून दाखवलंच आहे.
मोदांनीही त्यांच्या कामाच्या जाहिराती केल्या आहेत. केलेल्या कामाच्या
जाहिराती करण्यात गैर काय? आम्ही चोर्यामार्या केलेल्या नाहीत.’
शिवसैनिकांपुढे नतमस्तक
शिवसैनिकांच्या प्रेमाबाबत बोलताना उद्धव ठाकरे भावूक झाले. ‘मुंबईतील
विकासकामांचे श्रेय सर्व शिवसैनिकांकडून मलाच दिले जात आहे. पण मी कोण आहे?
मला तुम्ही उभं केलं? आई जगदंबा, शिवराय आणि शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद घेऊन
मी पुढे चाललोय. हे प्रेम असेच राहू द्या,’ असे सांगून त्यांनी
शिवसैनिकांसमोर दंडवत घातला. यावेळी अनेक शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
सरकारने काय केलं ते दाखवा
महापालिकेच्या विकासकामांचे श्रेय आमचेही आहे असे सांगणार्या विरोधकांना
उद्धव ठाकरे यांनी सुनावले. ‘कामाचे श्रेय मागता मग खड्ड्यांचेही घ्या आणि
एवढेच अंगावर येत असाल तर सरकारच्या आणि महापालिकेच्या कामांचीही तुलना करा.
यांनी मुंबईत ‘आदर्श’ घातला. भूखंडांची आरक्षणं बदलली, असे सांगून,
‘महापालिकेनं गेल्या पाच वर्षांत लोकांच्या हिताच्या कोणत्याही भूखंडाचं
आरक्षण बदलेलं नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
|
|