लाखो कामगार महामोर्चात उतरणार!
शिवसेनेसह सिटू, आयटक, इंटकचाही सहभाग
मुंबई, दि. १२ (विशेष प्रतिनिधी) - कामगार, शेतकरी आणि शेतमजुरांना देशोधडीला लावणार्‍या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेनेसह सिटू, आयटक, हिंद मजदूर सभा, इंटक या सर्व कामगार संघटना कृती समितीच्या झेंड्याखाली एकवटल्या आहेत. १८ फेब्रुवारीचा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी आजच्या बैठकीत पुढचे पाऊल टाकण्यात आले आणि लाखो कामगार मोर्चात सहभागी होऊन केंद्र सरकारच्या छातीत धडकी भरवणार हे निश्‍चित झाले.
१८ फेब्रुवारी रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा महामोर्चा निघणार असून या मोर्चाच्या तयारीसाठी शिवसेनाप्रणीत सर्व कामगार संघटनांची राज्यस्तरीय बैठक शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आयटकचे राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार गुरुदास दास आणि सिटूचे नेते व खासदार वासुदेव आचार्य यांची महामोर्चा तसेच मुंबईसह महाराष्ट्र बंदविषयी अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. या चर्चेनुसार १८ फेब्रुवारीला महामोर्चा व २० फेबु्रवारीला मुंबईसह महाराष्ट्र बंद करून केंद्राला इशारा देण्याचे ठरवले आहे. आजच्या बैठकीला शिवसेनेच्या भारतीय कामगार सेना महासंघाशी संलग्न असलेल्या सर्व संघटनांचे पदाधिकारी बैठकीला हजर होते.
बैठकीला एसटी कामगार संघटनेचे नेते व उपनेते राम भंकाळ, हिंद मजदूर सभेचे सचिव सूर्यकांत बांगल, सिटूचे उपाध्यक्ष के. एल. बजाज, आयटकचे उपनिमंत्रक ए. डी. गोलंदाज, इंटकचे अखिल भारतीय सचिव देवराज सिंग यांनीही मार्गदर्शन केले. भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष देवराम भोसले यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले, तर म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस यांनी आभार मानले.

भारतीय कामगार सेना महासंघाशी संलग्न असलेल्या संघटनांच्या पदाधिकारी बैठकीला मार्गदर्शन करताना सूर्यकांत महाडिक.

 

देशव्यापी संपात गिरणी कामगारही
मुंबई :
सर्व कामगार संघटनांनी पुकारलेल्या १८ फेब्रुवारीच्या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होत गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्‍न उचलून धरण्याचा निर्णय आज गिरणी कामगार एकजूटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आल्याची माहिती गिरणी कामगार नेते किशोर देशपांडे यांनी दिली आहे.गिरणी कामगारांविषयी राज्य सरकार संवेदनशील असून गिरणी कामगारांना घरे देण्यासाठीही सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेळोवेळी सांगत आहेत, पण यादृष्टीने कृती मात्र होताना दिसत नाही. त्यामुळेच १ लाख ४२ गिरणी कामगारांच्या घराचे स्वप्न अजूनही धूसरच बनलेले आहे. मुख्यमंत्री चक्क गिरणी कामगारांची दिशाभूल करीत असल्याचा पुनरुच्चार गिरणी कामगार नेत्यांनी आजच्या मेळाव्यात केला. राज्य सरकारचेही धोरण गिरणी कामगारविरोधी असल्यानेच १८ फेब्रुवारीच्या कामगारांच्या मोर्चात गिरणी कामगारांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहत सरकारला दणका द्या असे आवाहन या मेळाव्यात सर्वच गिरणी कामगार नेत्यांनी केले आहे. हेमंत राऊळ, उदय भट, डी. के. आंब्रे, बाळ खवणेकर, एकनाथ माने, हरिनाथ तिवारी, बबन मोरे आदी गिरणी कामगार नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, आजच्या मेळाव्यालाही गिरणी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावल्याची माहिती बाळ खवणेकर यांनी दिली आहे.
संपाच्या तयारीसाठी आज कुर्ला डेअरीत सभा
मुंबई :
महागाई आणि भ्रष्टाचार याविरोधात पुकारण्यात आलेल्या २०-२१ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाच्या तयारीसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस र. ग. कर्णिक हे उद्या, १३ फेब्रुवारी रोजी कुर्ला शासकीय दुग्धशाळा येथे जाहीर सभा घेणार आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या कामगार कपातीचे धोरण निषेधार्ह असून त्यामुळे प्रशासन ठप्प पडण्याची भीती कुर्ला दुग्धशाळा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस रमेश बल्लाळ यांनी व्यक्त केली असून र. ग. कर्णिक यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आल्याचे तसेच २०-२१ फेब्रुवारीचा संप यशस्वी होणारच असा निर्धार बोलून दाखविला.

महागाईच्या वणव्यात सामान्य जनता भरडली जात असताना आणि कामगारांची प्रचंड फरफट होत असताना आता डावे व उजवे असा भेदभाव करून चालणार नाही हे इतर संघटनांनाही कळून चुकले आहे. यामुळेच सर्वांनी एकत्रित महामोर्चा व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
- गजानन कीर्तिकर, अध्यक्ष स्थानीय लोकाधिकार समिती
कामगार व शेतकर्‍यांना न्याय देणारी एकही भूमिका सरकारची नाही. अशा निर्दयी सरकारला दणका देण्याची वेळ आलेली आहे. सामान्यांना न्याय मिळत नसेल तर तो मिळवावा लागतो. महामोर्चाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून शिवसेना हे दाखवून देईल.
- सूर्यकांत महाडिक, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना
 

 

 

Print this page

Send This Page

Pratikriya Kalwa

 


 

आपली प्रतिक्रिया कळवा