ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस; नदाल, वोजनियाकी यांचे आगेकूच

सामना ऑनलाईन । मेलबर्न

‘नंबर वन’ टेनिसपटू राफेल नदाल आणि महिला गटात द्वितीय मानांकित डेन्मार्कच्या कॅरोलिन वोजनियाकी या मानांकित खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. स्पेनच्या ३१ वर्षीय राफेल नदालला जागतिक क्रमवारीत ५२व्या स्थानी असलेल्या अर्जेंटिनाच्या लियोनार्डो मेयरने विजयासाठी चांगलेच झुंजविले. शेवटी २ तास ३८ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत नदालने ६-३, ६-४, ७-४ (७-४) अशी बाजी मारली. १५व्या मानांकित फ्रान्सच्या जो विल्फेड त्सोंगाने चुरशीच्या लढतीत कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हचा ३-६, ६-४, ७-६ (७-४) असा पराभव केला. ही लढत ३ तास ३७ मिनिटांपर्यंत रंगली. महिला गटात द्वितीय मानांकित कॅरोलिन वोजनियाकी हिने क्रोएशियाच्या जाना फेट हिला३-६, ६-२, ६-५ असे हरविले. चतुर्थ मानांकित युक्रेनच्या इलिना स्वीटोलिनाने दुसऱ्या फेरीत झेक प्रजासत्ताकच्या कॅटेरिना सिनिएकोव्हा हिला ४-६, ६-२, ६-१ असे हरविले.