मुंबईत 21पूल धोकादायक, स्ट्रक्चरल ‘रिऑडिट’मध्ये 15 धोकादायक पूल वाढले

21

देवेंद्र भगत । मुंबई

‘हिमालय’ पूल दुर्घटनेनंतर पालिकेने मुंबईतील सर्व पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट केले असून या रिपोर्टनुसार आणखी 21 पूल धोकादायक आढळले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आढळलेल्या एकूण 29 धोकादायक पुलांपैकी आठ पूल पाडण्यात आले आहेत. दरम्यान, धोकादायक पूल वाहतूक आणि रहदारीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे या पुलांची दुरुस्ती ऑक्टोबरमध्येच सुरू होणार आहे.

मार्चच्या 14 तारीखला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल कोसळून सात जणांचा बळी गेला तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. यामध्ये संबंधित पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिटर देसाईच्या ‘बोगस’ ऑडिट रिपोर्टमुळेच ही दुर्घटना घडल्याचे समोर आल्यानंतर तत्कालीन पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मुंबईतील सर्वच पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूर्व उपनगरात 7, पश्चिम उपनगरात 19 आणि शहर विभागात 3 धोकादायक पूल आढळले आहेत. शहर विभागातील तीनही अतिधोकादायक पूल पाडण्यात आले आहेत. तर स्ट्रक्चरल ऑडिटनुसार सुचवलेल्या पुलांच्या किरकोळ दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पश्चिम उपनगरातील धोकादायक पूल
हंस बुग्रा मार्ग, पाइपलाइन सर्व्हिस रोड ब्रीज, वलभाट नालाब्रीज, विठ्ठल मंदिर इरानी वाडी रगडापाडा ब्रीज, एसव्ही रोड कृष्णकुंजजवळील ब्रीज, आकुर्ली रोड, हनुमान नगर ब्रीज, ओशिवरा नाला, एसव्ही रोड ब्रीज, पिरामल नाला, लिंक रोड, एसबीआय कॉलनी ब्रीज, रतन नगर ते दौलत नगर ब्रीज

पूर्व उपनगरातील धोकादायक पूल
पूर्व उपनगरात आढळलेल्या सात धोकादायक पुलांपैकी चार पूल तोडण्यात आले असून कुर्ला येथील हरी मस्जीत नाला, लक्ष्मी बाग कल्हर्ट नाला ब्रीज, घाटकोपर निकांथ ब्रीज धोकादायक आहेत. तर विक्रोळी पंतनगर नाल्यावर रहदारी बंद करण्यासाठी पालिकेने लावलेले बॅरिकेड्स स्थानिक लोकांनी काढून टाकले आहेत.

वाहतूक कोंडीची भीती
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर आलेल्या पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये नव्याने 15 धोकादायक पुलांची भर पडल्यामुळे हे पूल पावसाळ्यात वाहतूक आणि रहदारीसाठी बंद केले जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून संबंधित ठिकाणी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

या पुलांवरून जाऊ नका
– वाकोला पाइप लाइन सर्व्हिस रोड ब्रीज
– जुहू तारा रोड ब्रीज
– धोबी घाट मजास नाला ब्रीज
– मेघवाडी नाला ब्रीज शामनगर अंधेरी
– वांद्रे-धारावी मिठी नदी ब्रीज
– रतननगर-दौलतनगर ब्रीज कांदिवली
– ओशिवरा नाला एसव्ही रोड गोरेगाव ब्रीज
– पिरामल नाला ब्रीज, लिंकरोड, गोरेगाव
– चंदावडकर नाला ब्रीज, मालाड
– गांधीनगर कुरार व्हिलेज मालाड ब्रीज
– प्रेमसागर नाला एसव्ही रोड ब्रीज, मालाड
– फॅक्ट्री लेन बोरिवली ब्रीज
– कन्नमवारनगर, घाटकोपर
– लक्ष्मीबाग नाला ब्रीज, घाटकोपर
– नीलकंठ नाला घाटकोपर

हे पूल पावसाळ्यात वाहतूक आणि रहदारीसाठी बंद केले जाणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची मोठी गैरसोय होण्याची भीती निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या