Pulwama : धक्कादायक माहिती उघड, दहशतवाद्यांची 3 आत्मघातकी हल्ल्यांची योजना

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जम्मू कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील जम्मू-श्रीनगर महामार्गावरील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भयंकर हल्ल्यात 42 जवान शहीद झाले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या 21 दहशतवाद्यांनी डिसेंबर, 2018 ला जम्म-कश्मीरमध्ये घुसखोरी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात 3 आत्मघातकी हल्लोखोरांचाही समावेश होता. कश्मीर खोऱ्यामध्ये एक आणि खोऱ्याबाहेर दोन वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याचा या दहशतवाद्यांची योजना होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Pulwama attack-कमांडर कामरान गाझीचा खात्मा;सूड घेतला, पण पाच बहाद्दर जवान शहीद

पुलवामा हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. जैशचा म्होरक्या मसूद अझहर याचा भाचा मोहम्मद उमेर याने गाझी रशीद उर्फ कामरान याला कश्मीरमध्ये हल्ला करण्यासाठी पाठवलेल्या दहशतवाद्यांचा कमांडर म्हणून नेमले होते. सोमवारी झालेल्या चकमकीत हिंदुस्थानने बदला घेत या गाझीचा खात्मा केला. सूत्रांच्या माहितीनुसार, मसूद अझहरचा दुसरा भाचा उस्मान हैदर आणि दहशतवादी अफजर गुरू याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जैशने ही मोहीम आखली होती.

16 गाड्यांची खरेदी
सूत्रांच्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी 16 गाड्यांची खरेदी केली होती. नजरेत येऊ नये म्हणून दहशतवाद्यांनी जुनी वाहमे खरेदी केल्याचेही समोर आले आहे.