21 जूनला मुख्यमंत्री आणि योगगुरू रामदेव बाबा नांदेडात

99

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेड येथे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन रामदेव बाबा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कौठा येथील मैदानावर साजरा करण्यात येणार आहे. जवळपास दोन लाख नागरिक, विद्यार्थी, महिला या कार्यक्रमात सहभागी होतील, असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचा राज्याचा प्रमुख कार्यक्रम नांदेड येथे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यानंतर या कार्यक्रमाच्या तयारीसाठी जवळपास पाचशे प्रशिक्षक नांदेड जिल्ह्यात आले असून, वेगवेगळ्या भागात फिरुन या शिबिराची ते माहिती देत आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारीत या कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार असून, असर्जन, कौठा येथील 32 एकर शासकीय जमिनीवर हा कार्यक्रम होणार आहे.

आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय युनोमध्ये झाल्यानंतर जवळपास दोनशे देशांमध्ये याच दिवशी योगदिनाचे आयोजन करण्यात येते. नांदेडचा कार्यक्रम हा राज्यस्तरीय असून, त्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या जिल्हास्तरीय कमिट्या गठीत करण्यात आल्याची माहिती खासदार चिखलीकर यांनी दिली. सदर योग शिबिरात नांदेड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयातील नववी, दहावी, अकरावी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयात यासाठीचे प्रशिक्षण देण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या