रेवदांडा किल्ल्यावर सापडल्या पोर्तुगीजकालीन 22 तोफा

209

सामना आॉनलाईन, अलिबाग

अलिबाग, तालुक्यातील रेवदांडा किल्ल्यावर पोर्तुगीजकालीन तब्बल 22 तोफा सापडल्या आहेत. सह्याद्री प्रतिष्ठानने केलेल्या उत्खननात या सर्व तोफा हाती लागल्या असून त्या एक टनापेक्षा जास्त वजनाच्या आणि आठ ते नऊ फूट लांबीच्या आहेत. 40 ‘मावळय़ां’नी पाच तास खोदकाम करून ही मोहीम फत्ते केली आहे. त्यामुळे गाडल्या गेलेल्या या तोफांना गतवैभव मिळाले आहे. गडाच्या दप्तरी आता एकूण 36 तोफांची नोंद झाली आहे.

रेवदांडा किल्ल्याला अगरकोट किल्ला म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याच्या साफसफाई मोहिमेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानने पुरातन विभागाकडे परवानगी मागितली होती. यानुसार प्रतिष्ठानचे 40 कार्यकर्ते आज  साफसफाई मोहीम करत होते. त्यावेळी गडाच्या तटबंदीजवळ झुडपात 14 फूट खोलीची व 3.5 फूट लांबीची तीन भुयारे आढळली. ही भुयारे काही अंतरावर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. यावेळी केलेल्या खोदकामात जवळपास 22 तोफा कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आल्या. या सर्व तोफा दोरखंडाच्या सहाय्याने तळपत्या उन्हात बांधून गडाच्या माथ्यावर आणल्या.

तहान, भूक हरपून टळटळीत उन्हात जोर लगा के हैशा!

तोफांना नवसंजीवनी देण्यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली 40 कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच खोदकाम सुरू केले होते. तहान, भूक हरपून टळटळीत उन्हात जोर लगा के हैशा करत या सर्व तोफा गडावर सुरक्षित ठिकाणी आणण्यात आल्या, अशी माहिती प्रतिष्ठानचे अलिबाग विभाग अध्यक्ष संजय पाडेकर यांनी दिली.

इतिहासात सात तोफांचीच नोंद

किल्ल्याचा इतिहास व दुर्ग अवशेषांवर आतापर्यंत झालेल्या लिखाणामध्ये गडावर केवळ सात तोफा असल्याची नोंद होती. आज नव्याने यामध्ये 22 तोफांची भर पडल्याने किल्ल्यावर एकूण 36 तोफांची नव्याने नोंद प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे. या सर्व तोफांवर गणना करण्यासाठी क्रमांक टाकण्यात आल्या आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या