महाराष्ट्रात वर्षभरात २२ वाघांचा मृत्यू

सामना प्रतिनिधी । नागपूर

केंद्र सरकारच्या वतीने वाघाच्या संवर्धनावर भर दिला जात असताना गेल्या वर्षात महाराष्ट्रात २२ वाघांचा, तर मध्य प्रदेशात यंदा २४ वाघांचा मृत्यू झाला. देशभरात ९८ वाघांचे विविध कारणांनी प्राण गेले आहेत.

राज्य सरकारने व्याघ्रदूत म्हणून ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या नियुक्ती केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरत्या वर्षात वाघांच्या मृत्यूची संख्या आठने वाढली आहे. पर्यटन आणि इतरही कामांचा बोजा वन विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्यांवर वाढल्याने वन व वन्यजीव संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. राज्य सरकार मध्य प्रदेशनुसार पर्यटनावर भर देत असताना संरक्षणाची बाजू मात्र कमकुवत होऊ लागली आहे. यामुळेच राज्यात सरत्या वर्षात २२ वाघांचे मृत्यू झाले आहेत. त्यातील १३ वाघांचा मृत्यू हा नैसर्गिक, आठ शिकारीमुळे, तीन विषप्रयोग, एका वाघाचा मृत्यू हद्दीच्या वादात आणि एक वाघाचा मृत्यू अपघातात झाला. पेंच व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिह्यात सर्वाधिक; प्रत्येकी सहा वाघ, नागपूर चार आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ तर गडचिरोली, मेळघाटमध्येही प्रत्येकी एक वाघ मरण पावले आहेत.