रेल्वेमध्ये नोकरीचे आमिष दाखवून 4 युवकांना 23 लाखांचा गंडा

3

सामना प्रतिनिधी । पेण

रेल्वेमध्ये सरकारी नोकरीचे व 7 व्या वेतनश्रेणीचे आमिष दाखवून बेरोजगार युवकांना लाखो रुपयांना गंडा घालणारी टोळी रायगड जिल्ह्यात सक्रिय आहे. या टोळीने पेण तालुक्यातील तीन व अलिबाग येथील एक अशा चार बेरोजगार तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी मिळवून देतो, असे अमिष दाखवून त्यांना नोकरीला लावण्यासाठी त्यांच्याकडून 23 लाख 50 हजार रुपये उकळले व या युवकांना रेल्वेचे लेटरहेडवर छापलेले खोटे अपॉइंटमेंट लेटर देऊन फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे.

28 डिसेंबर 2018 रोजी काही व्यक्तींनी 4 तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी देतो आणि एवढेच नाही तर रेल्वे विभागाचे कॉल लेटर ऑर्डर आणि अपॉइंटमेंट लेटरसारखे खोटे कागदपत्रे देऊन त्यांची फसवणूक केली आहे. फिर्यादी युवकाकडून रेल्वेमध्ये नोकरी देण्यासाठी 7 लाख 50 हजार तसेच साक्षीदार क्रमांक 1 कडून 3 लाख रुपये, साक्षीदार क्रमांक 2 कडून 10 लाख रुपये आणि साक्षीदार क्रमांक 3 कडून 3 लाख रुपये अशा पेण तालुक्यातील एकूण 4 बेरोजगारांची 23 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पेण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. या चार आरोपींविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 पैकी एका आरोपीला पेण पोलिसांना ताब्यात घेऊन त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा तपास पेण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजय धुमाळ हे करीत आहेत.

रेल्वेत नोकरी साठी परीक्षा द्यावी लागते त्यासाठी कोणत्या व्यक्तींना पैसे देऊ नयेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक धनाजी क्षिरसागर यांनी केले आहे.