शिव आरोग्य बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून महिन्याभरात २३२ रुग्णांवर उपचार

सामना ऑनलाईन । मुंबई

आरोग्य विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवआरोग्य बाईक अँब्युलन्सच्या माध्यमातून महिनाभरात २३२ रुग्णांना आपत्कालीन आरोग्य सेवा पुरविण्यात आली, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, २ ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेल्या या प्रकल्पाला मुंबईत सामान्य नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र गेल्या महिन्याभरातील आकडेवारीवरून समोर आलं आहे.

गेल्या महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अडचणीत सापडलेल्या रुग्णांसाठी ही सेवा उपयुक्त ठरली आहे. २३२ केसेस मध्ये प्रामुख्याने ३२ बेशुद्ध रुग्णांना वेळेवर उपचार करण्यात आले. त्याखालोखाल तापाचे १६, श्वास घेण्यात अडचण येत असलेले २५ रुग्ण, हृदयविकाराचा त्रास जाणवणाऱ्या २४, तर पोटदुखीच्या १४ रुग्णांना वेळीच बाईक अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून उपचार देण्यात आले. चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४०, गोरेगाव फिल्म सिटी भागातून ३७, चिता कॅम्प भागातून ३०, अशोक टेकडी भागातून २६, नागपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २४ अशाप्रकारे २३२ रुग्णांना सेवा देण्यात आली.

मालाड येथील ७० वर्षीय वृद्ध रुग्णास लकव्याचा त्रास होऊ लागल्याने १०८ या क्रमांकर कॉल करण्यात आला. बाईक अँब्युलन्सने तात्काळ घटनास्थळी पोहचून रुग्णावर प्रथमोपचार केले. गोरेगाव भागातील ४३ वर्षीय रुग्ण बेशुद्ध पडला असता बाईक अँब्युलन्सशी संपर्क साधण्यात आला.या परिस्थितीत देखील कुठलाही वेळ न दवडता बाईक अम्ब्युलन्स च्या माध्यमातून रुग्णावर प्रथमोपचार करण्यात आले. रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याने पुढील उपचारासाठी त्याला नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. गोरेगाव येथील ४५ वर्षीय रुग्णाला छातीत तीव्र वेदना होऊ लागल्याने १०८ बाईक अँब्युलन्सला कॉल करण्यात आला. या प्रकरणात देखील रुग्णास तात्काळ प्रथमोपचार देऊन जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. अपघाताच्या अनेक प्रकरणात देखील बाईक अँब्युलन्सची उपयुक्तता सिद्ध झाली आहे.

मुंबईतल्या वेगवेगळ्या अशा १० ठिकाणी या बाईक अँब्युलन्स कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. १०८ या निशुल्क हेल्पलाईन क्रमांकाच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. शहरातील ज्या भागातील रुग्णावर आपत्कालीन परिस्थिती ओढवली असेल त्या भागापासून नजीकच्या बाईक अँब्युलन्सद्वारे तात्काळ आरोग्यसेवा या प्रकल्पाच्या माध्यमातून पुरविण्यात येत आहे.

बाईक अँब्युलन्स ज्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत त्या ठिकाणची यादी पुढीलप्रमाणे:

१. अशोक टेकडी, जमिल नगर, भांडुप (प)
२. चिता कॅम्प प्रसूती गृह, मानखुर्द
३. धारावी पोलीस स्थानक
४. नागपाडा पोलीस स्थानक
५. कुरार पोलीस स्थानक, अप्पा पाडा, मालाड (पू)
६.चारकोप पोलीस स्थानक
७. गोरेगाव चित्रनगरी
८. खार धांडा पोलीस स्थानक
९. अप्पर आयुक्त पोलीस स्थानक, ठाकूर व्हिलेज
१०. मुंबई विद्यापीठ, कलिना कॅम्पस