दुष्काळग्रस्त मराठवाड्याला शेततळ्याचा दिलासा

4

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

राज्य शासनाने ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली. या योजनेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, मराठवाडा विभागात २५ हजार शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. त्यासाठी शासनाने १०६ कोटी ६१ लाख १२ हजारांचा निधी वितरीत केला आहे. वितरीत केलेल्या निधीची टक्केवारी ९७ झाली आहे. महाराष्ट्रात मराठवाडा हा प्रदेश इतर प्रदेशांच्या तुलनेत कमी पाऊस पडणारा आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा या प्रदेशाला नेहमी फटका सहन करावा लागतो. कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षणग्रस्त परिस्थितीचा सामना करावा लागतो. अत्यल्प पावसामुळे भीषण दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येथील अनेक नागरिकांवर आली आहे. उन्हाळी हंगाम सुरू झाला की, विभागातील नागरिकांची तहान टँकर्सवर भागवावी लागते. टँकर्सची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर होणारा खर्च याचा विचार केल्यानंतर दुष्काळाला कायमस्वरूपी मूठमाती देण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता होती.

मागेल त्याला शेततळे
मराठवाडा विभागातील पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यासाठी सरकारने ‘मागेल त्याला शेततळे’ ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचे जाहीर केले. त्यानुसार ही योजना मराठवाड्यात राबविली जात आहे. या योजनेला शेतकऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला आहे, या योजनेसाठी दिलेले ५० हजार रुपयांचे अनुदान तोकडे असले, तरीही योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र वाढत गेली आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ३९ हजार ६०० शेततळे घेण्याचे उद्दिष्टे निर्धारित करण्यात आले होते. या योजनेला मराठवाडा विभागातून सर्व जिल्ह्यांतून जोरदार प्रतिसाद प्राप्त झाला.
‘मागेल त्याला शेततळे’या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागातील ८७ हजार ७५६ शेतकऱ्यांनी शेततळे हवे म्हणून नोंदणी केली होती. प्रशासनाने अर्जांची छाननी करून ६८ हजार २७४ अर्जांना मंजुरी दिली होती. मंजूर अर्जांपैकी ६२ हजार ८६३ अर्जांना कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी आखणी करून दिलेल्या अर्जांची संख्या ५७ हजार ९६९ आहे. शेततळ्यांची कामे शेतकऱ्यांनी मोठ्या जोमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी २४ हजार ९४९ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून १ हजार ५९५ शेततळ्यांचे कामे प्रगतिपथावर आहेत. कामे पूर्ण झालेल्या शेततळ्यांपैकी शेतकऱ्यांना अनुदान अदायगी अदा केलेल्या शेततळ्यांची संख्या २२ हजार ७०५ आहे.

११० कोटींचे अनुदान प्राप्त
मराठवाडा विभागातील ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेच्या लाभार्थींसाठी शासनाने ११० कोटी ८ लाख ३४ हजारांचे अनुदान प्राप्त झाले आहे, मार्च एण्डपर्यंत शेततळ्यासाठी प्राप्त निधीतून १०६ कोटी ६१ लाख १२ हजार म्हणजे ९७ टक्के निधीचे वाटप करण्यात आले आहे. वाटप झालेल्या निधीची टक्केवारी ९७ आहे. विभागातील शेतकरीही शेततळ्यांची मागणी करीत आहेत. मात्र, त्यासाठी राज्य शासनाने ठेवलेली अनुदानाची रक्कम वाढवून द्यावी, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

शेततळ्याची पूर्ण झालेली कामे
जिल्हा             कामे पुर्ण              रक्कम अदा
(रक्कम लाखात )
संभाजीनगर        ६४८७                  ३०८८.६१
जालना             ५२६१                   २५२९.१५
बीड                ४७८६                  १६३८.३२
लातूर              १५५५                   ६४०.७
धाराशिव           २२२४                   ८०१.९३
नांदेड              १४१८                   ६०७.७८
परभणी            १४८६                   ६५४.२९
हिंगोली            १७३२                   ७००.३४
एकूण             २४९४९                 १०६६१.१२

आपली प्रतिक्रिया द्या