जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी 25 गावातील नागरिकांचा रास्ता रोको

52

सामना प्रतिनिधी । वडीगोद्री

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून पिण्यासाठी पाणी सोडावे म्हणून जालना जिल्ह्यातील व अंबड तालुक्यातील वडीगोद्रीॉ परिसरातील 25 गावातील सरपंच व गावकऱ्यांनी संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री येथे सोमवारी एक तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वर्षी निसर्गाने साथ न दिल्याने दुष्काळामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने परिसरातील जवळपास 25 गावातील विहिरी बोअर, छोटे मोठे पाणीसाठे पाण्याअभावी आटले आहेत. शासनाकडून अद्यापपर्यंत पाणी टंचाई सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसून पाण्यासाठी गावागावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

पाणीटंचाईमुळे माणसाबरोबर परिसरातील जनावराचे पाण्यासाठी होणारे हाल थांबण्यासाठी डाव्या कालव्याला पाणी सोडले तर किमान पावसाळ्यापर्यंत पाणी टंचाई प्रश्न सुटण्यास मदत होईल, आशा परिस्थितीत आता टंचाईग्रस्त गावातील जनावरांचा व नागरिकांचा पाण्याच्या प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक पदाधिकारी व सरपंच यांनी आक्रमक भूमिका घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाटबंधारे विभागाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ डाव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी पंचायत समिती सदस्य बापूराव खटके, आंतरवली सराठी देविदास डोंगरे, धनंजय दुफाके, सरपंच इलियास पठाण, बळीराम खटके, बाबासाहेब बोबले, श्रीमंत खटके, बाबासाहेब गावडे, बाळासाहेब गावडे, पंढरीनाथ खटके, विजय खटके, आनंद पवार, वसंत गायसमुद्रे, सुभाष भोईटे, शेषेराव शिनगारे, संदीप फटाले यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

आपली प्रतिक्रिया द्या