२५० मराठी माणसांची आठ कोटी रुपयांची फसवणूक

सामना ऑनलाईन । नवी मुंबई

पनवेलनजीक सुकापूर येथील गृहप्रकल्पासाठी सुमारे २५० ग्राहकांकडून बुकिंग रकमेपोटी चार ते पाच लाख रुपयांची रक्कम घेतल्यानंतर बिल्डरने ही प्रकल्पाची जागा परस्पर दुसऱ्या बिल्डरला विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे या २५० ग्राहकांची सुमारे आठ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांच्या विरोधाला डावलून दुसऱ्या बिल्डरने या ठिकाणी टॉवर्स काम सुरू केले आहे.

शिरीष चव्हाण या बांधकाम व्यावसायिकाने २००९ मध्ये सुकापूर येथील गृहप्रकल्पासाठी सुमारे २५० ग्राहकांकडून बुकिंग रक्कम घेतली होती. मात्र पुढे त्याने गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्याऐवजी ग्राहकांची फसवणूक केली. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून चव्हाण याला अटक केली. त्यावेळी हा भूखंड विकून तुम्हाला तुमचे पैसे परत देतो, असे चव्हाणने सांगितले होते. मात्र त्याने तसे केले नाही. उलट हा भूखंड अग्रवाल बिल्डरला विकून टाकला.

– सदरप्रकरणी कृष्णा मोरे यांच्यासह अन्य ग्राहकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यावेळी अग्रवाल बिल्डरने फसवणूक झालेल्या ग्राहकांचे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र आता या बिल्डरने हात वर केल्यामुळे सर्व ग्राहक हवालदिल झाले आहेत.

– एकीकडे बिल्डर ग्राहकांचे पैसे देत नाही आणि दुसरीकडे त्याच्या टॉवर्सचे बांधकाम वेगात सुरू झाले आहे. हे थांबविण्याची मागणी या ग्राहकांनी केली असली तरी त्याची दखल अद्याप कोणीही घेतलेली नाही.