घ्या… आता मॅरेज घोटाळा, हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक

1

सामना ऑनलाईन । बँकॉक

पेपर घोटाळा, स्टॅम्प घोटाळा, कोळसा घोटाळा, पाणी घोटाळा, चिक्की घोटाळा… हुश्श..! असे कितीतरी घोटाळे तुम्ही आम्ही ऐकले असतील, परंतु तुम्ही कधी मॅरेज घोटाळा ऐकला आहे का? नाही ना. पण थायलंडमध्ये असाच एक घोटाळा समोर आला आहे. या प्रकरणी एका हिंदुस्थानीसह 27 थाई महिलांना अटक करण्यात आली आहे.

‘नॅशनल डेली’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुळचा हिंदुस्थानी असलेला विक्रम लेहरी हा थायलंडच्या महिलांची हिंदुस्थानी नागरिकांसोबत नकली विवाह नोंदणी करत होता. लग्नाची नोंदणी झाल्यानंतर पुरुषांना अधिकृतपणे थायलंडमध्ये राहाता येत होते, परंतु लग्नानंतरही थाई महिला त्यांच्या पतीसोबत राहात नव्हत्या. विक्रम लेहरी याने तब्बल 25 पेक्षा जास्त महिलांना आठ ते दहा हजार थाई चलन देऊन कामावर ठेवले होते, अशी माहिती इमिग्रेशन ब्यूरोचे उपप्रमुख लेफ्टनंट जनरल सुरचित हाकपाल यांनी सांगितले.

मॅरेज घोटाळा समोर आल्यानंतर आम्ही याची कसून चौकशी केल्याचे हाकपाल यांनी म्हटले. यात अनेक धक्कादायक सत्य समोर आले. थाई महिलांचे हिंदुस्थानी व्यक्तींसोबत नकली विवाह नोंदणी केल्याचे उघडकीस आले. यासाठी हिंदुस्थानी पुरुषांच्या व्हीसाचीही व्यवस्था केली जायची. परंतु एका महिन्यात 10 हिंदुस्थानी पुरुषांनी नकली विवाह नोंदणीबाबत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आता मुख्य सूत्रधार विक्रम लेहरी आणि 27 थाई महिलांना अटक केली आहे. यात एका महिलेचे वय तर 70 च्या आसपास असल्याचे समोर आले आहे.