रायगड ग्रामपंचायत निवडणूक; 90 सरपंचांसह सदस्यपदासाठी 2732 अर्ज दाखल

सामना प्रतिनिधी । अलिबाग

लोकसभेची रंगीत तालीम म्हणून सर्वांचे लक्ष लागलेली रायगड ग्रामपंचायत निवडणूक रंगात येऊ लागली आहे. 90 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व सदस्यपदांच्या एकूण 935 जागांसाठी तब्बल 2732 इच्छुकांनी आपले अर्ज दाखल केले आहे. यामध्ये सरपंचपदाच्या 90 जागांसाठी 374 तर 845 सदस्यपदांसाठी 2358 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. त्यापैकी किती इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उरतील हे 13 फेब्रुवारीला अर्ज घेण्याच्या दिवशीच स्पष्ट होईल.

जिह्यातील 90 ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच व सदस्यपदासाठी 24 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत आहे. यासाठी 4 फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. उमेदवारी अर्ज भरण्याची 9 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असल्याने या दिवशी सर्वच राजकीय पक्षांनी आपले शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केले. छाननी अर्जानंतर 13 फेब्रुवारीला अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नक्की थेट सरपंच व सदस्यपदाच्या जागेसाठी उमेदवार उभे राहणार हे कळणार आहे. त्यानंतर निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांतर्फे आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.