अनधिकृत इमारत बांधणाऱ्या तीन बिल्डरांवर गुन्हे


सामना प्रतिनीधी । वसई

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून कोणतीही बांधकाम परवानगी न घेता नारिंगी येथे अनधिकृत इमारत उभी करणाऱया तीन बिल्डरांविरोधात विरार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे बनावट सीसी तयार करून गाळे विकण्याचा या बिल्डरांचा डाव हाणून पाडला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. बोगस बांधकाम प्रमाणपत्र तयार करून हे तिघेजण या इमारतीमधील गाळे विकण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती विभाग कार्यालयाला मिळाल्यानंतर तेथे युद्धपातळीवर हालचाली झाल्या. या तिन्ही बिल्डरांच्या विरोधात विभाग अधिकाऱयांनी विरार पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार या तिन्ही बिल्डरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.