विक्रोळीत रस्ता खचल्याने ट्रक पलटी; चौघे चिरडले

50

सामना ऑनलाईन । मुंबई

ट्रकचालकाचा आगाऊपणा चार तरुणांच्या जिवावर बेतल्याची संतापजनक घटना गुरुवारी रात्री विक्रोळी पार्पसाइटच्या सूर्यनगरात घडली. रस्त्यावरील चेंबरचे काम केले असल्याने तेथून ट्रक नेऊ नको असे युवासेनेचे शाखा अधिकारी अश्विन हेबारे यांनी चालकाला सांगितले, पण तरीदेखील चालकाने धान्याने भरलेला ट्रक चेंबरवरून नेल्याने रस्ता खचला आणि ट्रकचा मागचा भाग कलंडल्याने त्याखाली अश्विनसह अन्य चौघेजण चिरडले. त्यातील एक तरुण जखमी झाला तर उर्वरित तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रात्री 11 वाजता सूर्यनगर येथील शिवसेना शाखेच्या समोरच घडली.

या रस्त्यावरील चेंबरचे काम ‘यश इफ्रा कंपनी’च्या हेमंग जैन या कॉण्ट्रक्टरने केले होते. काम केलेल्या ठिकाणी बॅरिकेडस् करण्यात आले होते. या घटनेप्रसंगी तेथे असलेले अश्विन हेबाळे (34), विशाल शेलार (22), चंद्रशेखर मुसळे (35), अब्दुल हमीद शेख (41) आणि चाँद हसन शेख (38) हे ट्रकखाली चिरडले. दुर्दैवाने चाँद शेख वगळता चौघांनी तेथेच प्राण सोडले होते तर पोलिसांनी गंभीर जखमी चाँदला तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पार्पसाइट पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून ट्रकचालक देवेंद्र जाधव (44) याला अटक केली आहे.

सूर्यनगरवर शोककळा
अश्विन हेबाळे हे युवासेनेचे शाखा अधिकारी म्हणून काम करीत होते. हेबाळे यांना तीन वर्षांची मुलगी आहे. विशाल हादेखील शिवसैनिक होता. तसेच चंद्रशेखर हे रिक्षाचालक होते. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. त्यांचे मृतदेह आज परिसरात आणण्यात आले तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला.

…तर अनर्थ घडला असता
हीच घटना सायंकाळच्या सुमारास जरी घडली असती तर वर्दळीमुळे मोठा अनर्थ घडला असता अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. अपघात झाल्याचे कळताच आमदार सुनील राऊत, उपविभागप्रमुख चंद्रकांत जाधव, नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतीचा हात दिला.

आपली प्रतिक्रिया द्या