समर्थनगर येथे सव्वातीन लाखाचा गुटखा जप्त

सामना प्रतिनिधी। धाराशिव

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहरातील समर्थ नगर भागात धाड टाकली. यावेळी तीन लाख पंचवीस हजार रुपये किंमतीचा विविध कंपन्याचा जवळपास ३५ पोते गुटखा जप्त करण्यात आला.

समर्थ नगर भागातील मैनोद्दीन तांबोळी हे आपल्या मोटारसायकलवरुन दुपारी १ च्या सुमारास शहरात फिरत असताना पोलिसांनी संशयावरुन त्यास त्याब्यात घेतले. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता तो शहरातील काही दुकानात गुटखा पुरविण्याचे काम करत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर संबंधित पोलिसांनी याबाबतची माहिती अन्न व औषण प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी आर. आर. पाटील यांना दिली. त्यानंतर पाटील यांनी मोटारसायकल स्वारास ताब्यात घेतले. यावेळी त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने समर्थ नगर भागातील एका घरात गुटख्याचा मोठा साठा असल्याचे सांगितले.

या माहितीच्या आधारे अन्न व औषण प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने समर्थ नगर भागातील जहिर तांबोळी यांच्या घरावर धाड टाकून वजीर गुटखा – १० पोते, बादशहा – ८ पोते व गोवा गुटख्याचे १७ पोते असे एकूण ३५ पोते गुटखा पकडला . बाजारात त्याची किंमत ३ लाख २५ हजार एवढी आहे. या प्रकरणी गुटखा वाहतूक करणारी मोटारसायकल जप्त करण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.