घरी परततानाच ‘GT’ च्या 3 परिचारिकांवर काळाचा घाला

सीएसएमटीजवळ कोसळलेल्या पूलाचा सांगाडा

सामना ऑनलाईन, मुंबई

पूल दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन महिला या जीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होत्या. मात्र डय़ुटी संपवून घरी परततानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपूर्वा प्रभू (40) आणि रंजना तांबे (35), भक्ती शिंदे (40) अशी त्या तिघांची नावे आहेत. दरम्यान, या दुर्घटनेनंतर घाबरलेल्या नोकरदारांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. या वेळी आपल्या माणसाला गमावल्यामुळे त्यांनी आक्रोश केला.

पूल कोसळल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्यानंतर या मार्गावरून रोज याच वेळात व याच पुलावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी, रुग्णालयात धाव घेतली. काहींना नातेवाईकांचे फोन लागत नसल्यामुळे त्यांची चिंता आणखीनच वाढली होती. पुलाच्या ढिगाऱ्याखाली किती लोक दबले याची माहिती सुरुवातीला मिळत नसल्याने लोकांमध्ये आणखीनच घबराट पसरली. याच वेळी पाच जण मृत्यू व अनेक जण जखमी झाल्याचे कळताच नातेवाईकांनी जवळच्या जीटी व सेंट जॉर्जेस रुग्णालयात धाव घेतली. नातेवाईकांची जखमींना शोधण्यासाठी धावपळ सुरू होती. या दुर्घटनेत मृत पावलेल्या रंजना तांबे या सिद्धी शिवसागर सोसायटी, गणेशनगर, डोंबिवली पश्चिम तर अपूर्वा प्रभू या बेडेकर गल्ली, ठाकूरवाडी, डोंबिवली पश्चिम येथे राहत होत्या. मात्र घरी जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला.

स्थायी समितीकडे कोणताही प्रस्ताव पेंडिंग नव्हता

संबंधित पुलाच्या दुरुस्तीसाठीचा कोणताही प्रस्ताव स्थायी समितीकडे पेंडिंग नसल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आज दुपारपर्यंत पूर्ण पूल पाडणार

दुर्घटना झाल्यामुळे संपूर्ण पूल धोकादायक बनला आहे. या पार्श्वभूमीवर दुर्घटनेनंतर काही तासांतच संपूर्ण पूल पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या मदतीने पूल पाडण्याचे काम सुरू आहे. शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत हे काम पूर्ण हाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म  क्रमांक एकला लागूनच हा ब्रीज आहे. मुंबई शहरासह दोन्ही उपनगरांतून येणारे लाखो प्रवासी दररोज या ब्रीजवरून फोर्ट, मंत्रालय, चर्चगेट परिसरात असणाऱ्या कार्यालयांमध्ये नोकरीसाठी जात असतात. या पुलाखालून 24 तास वाहनांची मोठी वर्दळही असते. या महत्त्वपूर्ण पुलावरून प्रवासी जात असतानाच अचानक पुलाचा भाग कोसळला. यावेळी पुलावरून अनेक प्रवासी थेट रस्त्यावर कोसळले. यामध्ये काही प्रवासी स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघांचा जीटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले. या दुर्घटनेत पुलाचा भाग कोसळल्यावर प्रचंड मोठा आवाज झाला. शिवाय अचानक ही घटना घडल्याने जखमी आणि जवळच्या प्रवाशांच्या किंचाळण्यामुळे संपूर्ण परिसरात एकच घबराट उडाली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर जवळच्याच जीटी रुग्णालयात उपचारासाठी  दाखल करण्यात आले. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर, उद्योगमंत्री  सुभाष देसाई, मंत्री गिरीश महाजन, खासदार अरविंद सावंत, आमदार राज पुरोहित, नगरसेविका सुजाता सानप यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस, पालिका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने बचावकार्य करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले प्रवासी आणि नागरिकांनीही बचावकार्यात मदत केली.

दुर्घटनेतील जखमी

सोनाली नवले (30), अद्वैत नवले (3), राजेंद्र नवले (33), राजेश लोखंडे (39), आत्माराम येडगे (31), जयेश अवलानी (46), महेश शेटय़े (36), अजय पंडित (31), हर्षदा वाघरे (35), विजय भागवत (42), नीलेश पाटवकर (21), मुनीलाल जयस्वाल (63), मोहन मझदा (43), आयुषी राणा (21), राम कुपरेजा (59), सुनील तिरोडकर (39), अनिकेत जाधव (19), अभिजीत माना (21), राजकुमार चावला (49), सुरेश बॅनर्जी (37), रवी शेट्टी (40), नंदा कदम (56), राकेश मिश्रा (40), अत्तार खान (45), सुजय माझी (28), कल्लूभाई सोळंकी (47), दीपक पारेख, प्रसन्न कुमार (27), अनोळखी (32), परशुराम पवार, सिराज खान (55), राजेदास दास (23), राहिद (32)

मुंबईकर हळहळले…

याआधी 29 सप्टेंबर 2017 रोजी एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी होऊन 23 जणांचा बळी गेला होता, तर त्यानंतर 3 जुलै 2018 रोजी अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला होता. सीएसएमटीजवळील पादचारी पुलाचा भाग कोसळण्याच्या आजच्या खळबळजनक घटनेमुळे हा मागील सर्व घटनाक्रम आठवून मुंबईकरांचे आयुष्य किती क्षणभंगूर आहे याची पुन्हा प्रचीती आल्याने मुंबईकर अक्षरशः हळहळले.

पादचारी पुलाचा मालक कोण?

सीएसएमटी इमारतीच्या बाहेरील कोसळलेल्या पादचारी पुलाची मालकी नक्की कोणाची, यावरून रेल्वे आणि पालिका यांच्यात वाद सुरू झाला आहे. मध्य रेल्वेने हा पब्लिक ‘एफओबी’ असल्याचे सांगत याची मालकी नाकारली आहे. तर पालिकेने अशा रेल्वेला लागून असलेल्या पुलांच्या डागडुजीसाठी रेल्वेला पैसे दिल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरवस्थेला जबाबदार कोण, असा पेच निर्माण झाला आहे.

3 जुलै 2018 रोजी अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला त्यावेळीदेखील रेल्वे आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. रेल्वे हद्दीतील पालिकांच्या पुलांची देखभाल करण्यासाठी रेल्वेला वेळोवेळी पालिकेने पैसे दिल्याचे पालिकेचे म्हणणे होते. तर आमची माणसे इन्स्पेक्शनसाठी गेल्यास रेल्वे आमच्या माणसांवर घुसखोरी केल्याचे ‘ट्रेस पासिंग’चे गुन्हे दाखल करते, मग आमची माणसे दुरुस्तीची कामे करणार कशी, असा सवाल पालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी केला होता. सीएसएमटीचा कोसळलेला पादचारी पूल 1984 साली बांधण्यात आला होता, अशी माहिती रेल्वेनेच माहितीच्या अधिकाराखाली रेल्वे कार्यकर्ते समीर झव्हेरी यांना दिली आहे. मात्र त्यावेळी हा पूल नेमका कोणी बांधला याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लोअर परळ येथील डेलीस पूल धोकादायक ठरवून पाडल्यानंतर या पुलाची उभारणी कोणी करायची यावरूनही वाद झाला होता. अखेर रेल्वेमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वेच्या हद्दीतील भाग रेल्वे बांधणार आणि पालिका हद्दीतील भाग पालिका बांधणार यावर तडजोड करण्यात आली होती.

हिमालय पूल दुर्घटना, शिवराय संचलनाऐवजी शिवप्रभूंना केवळ पुष्पहार अर्पण करणार

शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने आज भव्य शिवराय संचालन मोठय़ा उत्साहात होणार होते. यंदा या शिवराय संचलनाचे 45 वे वर्ष आहे. फोर्ट ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हे संचलन होणार होते. मात्र आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हिमालय पादचारी पूल कोसळून पाचजणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आज शिवराय संचलनाऐवजी शिवरायांना हार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

रिझर्व्ह बँक अमर बिल्डिंग येथे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत शिवराय संचलनाला सुरुवात होणार होती. याच ठिकाणी शिवरायांना हार अर्पण करण्यात येणार असून येथेच हिमालय पादचारी पूल दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेली नागरिकांच्या नातेवाईकांच्या दु:खात मी सहभागी आहे. जखमींना लवकरात लवकर आराम मिळो अशी मी प्रार्थना करतो. त्यांना महाराष्ट्र सरकारकडून सर्व प्रकारची आवश्यक मदत केली जात आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी