साताऱ्यात संतप्त जमावानं पोलीस व्हॅन फोडली, तीन पोलीस जखमी

10

सामना ऑनलाईन । सातारा 

मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेला मोर्चा संपल्यानंतर बुधवारी दुपारी जमावाने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. जमावाला आवर घालण्यासाठी पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला आहे. आंदोलकांच्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत.

साताऱ्यात मराठा आराक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात आलेला मोर्चा संपल्यानंतर दुपारी आंदोलक आपापल्या घरी गेले. मात्र, त्यानंतर अचानक पुणे – बेंगलुरु महामार्गावरील वाहनांवर दगडफेक सुरू झाली. संतप्त जमावाने पोलीस व्हॅनलाही लक्ष्य केले. दगडफेकीत पोलीस व्हॅनचे आणि एका कंटेनरचे मोठे नुकसान झाले असून यामध्ये तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जमाव आणखीनच हिंसक बनत चालल्याने पोलिसांना अखेर हवेत गोळीबार करावा लागला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी विखुरल्या जमावातील काहींना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. आंदोलक हिंसक बनत चालल्याचे निदर्शनास येताच पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या.

दरम्यान, दगडफेकीमुळे महामार्गावर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे कोल्हापूर आणि पुण्याच्या बाजूकडील वाहतुक काही काळासाठी थांबविण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या