यूपी- रुग्णालयात ऑक्सिजनअभावी ६३ मुलांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । गोरखपूर

उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमध्ये असलेल्या बाबा राघव दास रूग्णालयातील ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या मुलांची संख्या ६३ वर गेली आहे. रुग्णालयात १३ मुले एनएनयू वॉर्डमध्ये दाखल होती, तर १७ मुले मेंदूज्वर वॉर्ड मध्ये दाखल होती. रुग्णालयाचे ६९ लाख रूपयांचे बिल थकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या कंपनीने गुरूवारी रात्रीपासूनच ऑक्सिजन पुरवठा बंद केला होता. त्यामुळे मागील ४८ तासात ६३ मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पाइपद्वारे मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा ठप्प होता आणि रुग्णालयातील ऑक्सिजनचे सिलेंडर संपले होते त्यामुळे ३० मुलांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ९ आणि १० ऑगस्ट रोजी रुग्णालयाचा दौरा केला होता. त्यामुळे मुलांचे पालक आता मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारत आहेत.

पुष्पा सेल्स सप्लाय कंपनीने ६९ लाख रूपयांचे बिल थकल्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा गुरुवारी बंद करत असल्याचे पत्र रुग्णालयाला पाठवल्याचे सांगितले. बिलाचे पैसे भरले तर ऑक्सिजनचा पुरवठा लगेच सुरू करू असेही पत्रात नमूद केल्याचे पुष्पा सेल्स सप्लाय कंपनीचे अधिकारी सांगत आहेत.