संगमनेरमध्ये दोन एटीएम फोडून ३० लाख लुटले

सामना ऑनलाईन,संगमनेर

शहरातील मध्यवस्तीत असणारे एसबीआय आणि इंडकॅशचे एटीएम पहाटेच्या सुमारास फोडून चोरटय़ांनी सुमारे ३० लाखांची रोकड लुटली. चोरटयांनी ऑरेंज कॉर्नर येथील एटीएममधून २६ लाख रुपये, तर पेटिट कनिष्ठ महाविद्यालयासमोरील एटीएममधून सुमारे ४ लाख रुपये लुटल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑरेंज कॉर्नर परिसरात एसबीआयचे एटीएम आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या या एटीएम परिसरात अनेक अनेक दुकाने आणि घरे आहेत. आज पहाटे चोरटय़ांनी गॅस कटरने शटरचे कुलूप तोडले. आत जाऊन एटीएम मशीनही गॅस कटरने तोडून त्यातील २६ लाख ३० हजार रुपये लांबविले. एटीएममध्ये प्रवेश करण्यापूर्वी चोरटय़ांनी बाहेर असलेला सीसीटीव्ही कॅमेराची वायर कापली, तर आतमधील कॅमेऱयाची तोडफोड केली. त्यानंतर चोरटय़ांनी आपला मोर्चा पेटिट कनिष्ठ महाविद्यालय परिसरात असलेल्या इंडकॅशच्या एटीमकडे वळवला. ते एटीएम फोडून त्यातील रक्कम पळविली. इंडकॅशच्या एटीएममधून चोरीला गेलेल्या रकमेचा निश्चित आकडा समजू शकला नाही. मात्र, यातुन सुमारे चार लाख रुपये चोरीला गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीणच्या श्वानपथकाला व ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाने ऑरेंज कॉर्नरपासून सुयोग सोसायटीपर्यंत, तर पेटीट कनिष्ठ महाविद्यालयासमोरून तांबे हॉस्पीटलपर्यंत मार्ग दाखविला. या पक्ररणी एसबीआयचे शाखाधिकारी राम विष्णू वेजरे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक पंकज निकम तपास करीत आहेत.

भारतीय स्टेट बॅँकेने ऑरेंज कॉर्नर येथे नवीन एटीएम सुरू केले आहे. एटीएम सुरू करताना बँक अधिकाऱयांनी पोलिसांना माहिती देणे बंधनकारक होते. मात्र, अशी कुठलीही अधिकृत माहिती बँकेने दिलेली नाही असे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी सांगितले आहे.