वासाडेंच्या कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मागितली इच्छामरणाची परवानगी

52

अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर

चंद्रपुरातील 300 जणांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून इच्छा मरणाची परवागी मागितली आहे. हे सगळे जण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांच्या अभियांत्रिकी कॉलेजमधील शिक्षकेतर कर्मचारी आहेत. गेले सात महिने हक्काचे वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांनी आत्तापर्यंत अनेक आंदोलनं केली आहे. त्याचा काहीही फायदा न झाल्याने आपल्याला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी इथं बल्लारपूर इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात चारशेवर प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. इथल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त बसचालक, स्वच्छता कर्मचारी यांनाही वेतन मिळणं बंद झालं आहे.  या कामगारांची संख्या शंभरहून अधिक आहे. दिवाळीमध्ये या कर्मचाऱ्यांनी वासाडेंच्या घराबाहेर आंदोलन केलं होतं. यावेळी पोलिसी बळाचा वापर करत त्यांना हाकलून देण्यात आलं. पगार मिळत नसतानाच या कॉलेजने आपला भविष्य निर्वाह निधीही भरीत नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे.

वासाडे यांनी वेतन विलंबासाठी शासनाकडे बोट दाखवलं आहे. कर्मचा-यांचं वेतन न देणं, भविष्य नर्वाह निधी न भरणं, यासारख्या गंभीर गोष्टी संस्थेकडून होत असल्यानं या महाविद्यालयाचे प्राचार्य पोलिस कारवाईच्या भीतीनं आधीच राजीनामा देऊन निघून गेले. या अशा वातावरणाला कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी राज्यातील आणि केंद्रातील सरकारने आम्हाला न्याय द्यावा अन्यथा इच्छामरणाची पारवानगी तरी द्यावी मागणी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या