३२५ मालमत्तांचा ६ फेब्रुवारीला लिलाव

फोटो प्रातिनिधीक

सामना प्रतिनिधी । जळगाव

महापालिकेच्या कराच्या थकबाकीपोटी दोन महिन्यांत सील केलेल्या सुमारे ३२५ मालमत्तांचा ६ फेबुवारीला जाहीर लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या सभागृहात सकाळी ११ वाजेपासून लिलावाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. लिलावात कोणीही भाग न घेतल्यास पालिका थेट नाममात्र बोली लावून मालमत्ता ताब्यात घेणार आहे.

जकात व एलबीटी या सारखे स्व: उत्पन्नाचे मार्ग बंद झाल्यानंतर पालिकेसमोर मालमत्ता कराची आकारणी हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान वेळेवर न मिळाल्यास स्व: उत्पन्नातून कारभार चालवावा लागतो. परंतु पालिकेची स्व: उत्पन्नाची स्थिती देखील कमकुवत आहे. आतापर्यंत केवळ ६० टक्के कराची वसुली झालेली आहे. दोन महिन्यांत पालिकेने तब्बल ८१४ मालमत्तांना सील ठोकले होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात जाहीर प्रकटन देऊन थकबाकीची रक्कम भरण्याची सूचना केली होती. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात थकबाकीदारांनी रक्कम भरून प्रतिसाद दिला होता. परंतु त्यानंतर ही सुमारे ३०० ते ३५० थकबाकीदारांनी पालिकेच्या कारवाईकडे दुर्लक्ष केल्याने आता अशा मालमत्तांचा थेट लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लिलावाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याने शहरातील बँका, सोसायटी व नागरिकांनी लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्ता कब्जेगहाण, ताबेगहाण अथवा बोजा असल्यास तीन दिवसांत कळवायचे आहे. तसेच अशा मिळकती संदर्भात कोणतेही व्यवहार करू नये, तसे व्यवहार केल्यास बेकायदेशीर समजण्यात येतील, असा इशारा दिला आहे. लिलावात कोणीही भाग घेतला नाही तर महापालिका नाममात्र बोली लावून स्थावर मालमत्ता ताब्यात घेणार आहे.