बारावीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डात ३३६४७ विद्यार्थी

1
फोटो प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा दि.२१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी कोकण बोर्डामधून ६० परीक्षा केंद्रांवर ३३६४७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात २१८८१ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११७७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यंदा परीक्षा कक्षात उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. पेपरफुटी आणि कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी शिक्षण मंडळाने हे पाऊल उचलले असून परीक्षार्थीला किमान अर्धा तासापूर्वी परीक्षा कक्षात उपस्थित राहावे लागणार आहे.

दि.२१ फेब्रुवारी रोजी बारावीचा इंग्रजीचा पेपर आहे. सकाळी ११ वाजता परीक्षेला सुरुवात होणार आहे. कोकण बोर्डामध्ये ६० परीक्षा केंद्रांवर ३३६४७ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. त्यामध्ये १७४५६ विद्यार्थी आणि १६४०१ विद्यार्थिनींचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ३७ परीक्षा केंद्रावर ११४६७ विद्यार्थी आणि १०४२४ विद्यार्थिनी परीक्षेला बसणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २३ परीक्षा केंद्रावर ५९८९ विद्यार्थी आणि ५९७७ विद्यार्थिनी परीक्षेला बसणार आहेत. बारावीची परीक्षा २० मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.

परीक्षेच्या वेळी होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना तणावमुक्त आणि कॉपीमुक्त परीक्षेसाठी आवाहन करण्यात आले आहे. तसेच पेपरफुटीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकेची २५ सीलबंद पाकिटे वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समक्ष पर्यवेक्षक फोडणार आहे. त्यापूर्वी तो पर्यवेक्षक दोन विद्यार्थ्यांच्या सह्या घेणार आहे. पूर्वी प्रश्नपत्रिकेची सीलबंद पाकिटे केंद्रप्रमुखांकडून फोडली जात होती आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी परीक्षा कक्षात उशिराने येणाऱ्या परीक्षार्थीला प्रवेश दिला जात होता. यंदा उशिराने येणाऱ्या परीक्षार्थीला प्रवेश दिला जाणार नाही. परीक्षेच्या वेळेनुसार किमान अर्धातासापूर्वी परीक्षा केंद्रात परीक्षार्थिनी हजर राहायचे आहे. एखादा परीक्षार्थी उशिराने आला तर त्याचे कारण विचारत घेतले जाणार असून त्याने सांगितलेले कारण योग्य असल्याचा अहवाल केंद्रप्रमुखांना द्यावा लागणार आहे.