बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूचे ३४ रूग्ण, तर २७२ संशयीत रूग्ण

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सर्वत्र डेंग्यूच्या रूग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यातही डेंग्यू झालेल्या निश्चित व संशयीत रूग्णसंख्येत वाढ दिसते. जिल्ह्यात ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत सेंटीनल सेंटर येथे १६२ रक्तजल नमुन्यांची केलेल्या विश्वसनीय इलायझा चाचणीद्वारे ३४ रूग्णांना निश्चित डेंग्यू आजार झालेला आहे. तसेच रॅपीड टेस्टद्वारे खाजगी रूग्णालय/प्रयोगशाळा येथे तपासलेल्या रक्तजल नमुन्यांमध्ये २७२ डेंग्यू आजाराचे संशयीत रूग्ण आढळून आलेले आहे. डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

डेंग्यू आजारावर प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागामार्फत जलद ताप सर्वेक्षण करणे, तापाच्या रूग्णांचे रक्त नमुने गोळा करणे, किटकशास्त्रीय सर्वेक्षण करणे, डास अळ्या आढळून आलेली भांडी रिकामी करून घेणे, टेमीफॉसचा वापर करणे, कोरडा दिवस पाळण्याबाबत आरोग्य शिक्षण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच डेंग्यू संशयीत रूग्णांचे रक्तजल नमुने घेऊन तपासणीकरीता सेंटीनल सेंटर, अकोला येथे पाठविणे, ग्रामपंचायतींच्या सहकार्याने धुर फवारणी करणे, डासोत्पत्ती स्थानात गप्पीमासे सोडण्यात येत आहे. भारत सरकारने डेंग्यू नोटीफायबल डिसीज घोषित केल्यामुळे शहरातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक/प्रयोगशाळा यांचेकडे रॅपीड डायग्नोसिस टेस्ट किटद्वारे संशयीत डेंग्यू दुषित आढळून आलेल्या रूग्णांचे नाव, पत्ता व चाचणी पेपर जिल्हा हिवताप कार्यालयास पाठविण्याबाबत संबंधितांना पत्र दिले आहे.

बुलढाणा शहरात डेंग्यूवर प्रतिबंध करण्यासाठी धडक मोहिम राबविण्यात येत आहे. आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत वार्डनिहाय जास्तीत जास्त गृहभेटी देऊन जलद ताप सर्वेक्षण करणे, डास अळ्या आढळून आलेल्या पाणी साठ्यामध्ये टेमीफॉस टाकणे, किटकशास्त्रीय सर्वेक्षण करणे आदी कार्यवही करण्यात येत आहे. तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचे पाणी साठे उघडे असता कामा नये, याबाबत बांधकाम धारकास नोटीस बजावण्यात येणार आहे. सामान्य रूग्णालय येथे डेंग्यू नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शहरातील चैतन्यवाडी परिसरात नगराध्यक्षा, मुख्याधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, नगरसेवक तसेच न.पच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, जिल्हा हिवताप कार्यालयाचे आरोग्य कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घरोघरी पाहणी करून डासअळ्या आढळून आलेले पाणीसाठे व विहीरीत गप्पीमासे सोडण्यात आले आहे. नगर पालिकेमार्फत मायकिंगद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. न.प मुख्याधिकारी यांना नाल्या वाहत्या करणे, नियमित साफसफाई करणे, सर्व्हिस लाईनचे ब्लॉकेजेस काढणे याबाबत कार्यवाही करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या आहेत उपाययोजना
डेंग्यूवर निश्चित असा औषधोपचार अथवा लस नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे हाच एकमेव मार्ग आहे. त्या पुढीलप्रमाणे : आपल्या आजुबाजूचा परिसर स्वचछ ठेवा, परिसरातील केरकचरा एकत्रित करून जाळून नष्ट करा, डबकी असल्यास ती त्वरित बुजवावी, शक्य नसल्यास त्यावर तेल/वंगण टाकावे किंवा गप्पीमासे साडावेत. घरात, गच्चीवर अडगळीच्या वस्तु नष्ट कराव्यात, आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळून या दिवशी घरातील पाणी साठे स्वच्छ करावी, त्यांना उन्हात वाळवून मगच त्यात पाणी भरावे व कापडाने झाकून ठेवावे, पाणी टंचाई असल्यास तेच पाणी कापडाने गाळून पुन्हा वापरात येईल, परंतु पाणी गाळून घेतल्यानंतर कापडावर राहीलेल्या डासांच्या अळ्या नालीत न टाकता जमिनीवर कोरड्या जागेत टाकावे. छतावरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकण बसवा, व्हेंट पाईपला जाळी बसवा, खिडक्यांना डस रोधक जाळी बसवून झोपतांना मच्छरदानीचा वापर करावा, गावात/वार्डात जेवणाच्या कार्यक्रमानंतर वापरलेले द्रोण, ग्लास, पत्रावळ्या तशाच फेकून न देता एका ठिकाणी गोळा करून जमिनीत पुरवावे अथवा जाळून नष्ट करावे, परीसरात बांधकाम सुरू असल्यास पाणी साठे झाकून ठेवावे.