मुंबई, नवी मुंबईतील साडेतीन हजार झोपडया हटवल्या

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबई आणि उपनगरे तसेच नवी मुंबईत असणाऱ्या कांदळवनांतील ३७०५ अनधिकृत झोपड्या गेल्या सवादोन वर्षांत हटवण्यात आल्या अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत विचारण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

शिवसेना आमदार संजय पोतनीस, अशोक पाटील आणि सुनील प्रभू यांनी यासंदर्भात प्रश्न विचारला होता. मुंबई आणि उपनगरांतील विविध भागांत असलेल्या कांदळवनांची सन २००५ ते २०१६ या कालावधीत उपग्रहाद्वारे नकाशे आणि छायाचित्रे काढण्यात आली होती. त्यापैकी किती कांदळवनांवर अतिक्रमण झाले आहे याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिल्याबाबत या आमदारांनी प्रश्न विचारला होता. वर्सोवा, कांदिवली, चारकोप, वांद्रे, मार्वे, मालवणी, गोरेगाव आणि कांजुरमार्ग येथील कांदळवनांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणांवर काय कारवाई केली, असेही त्यांनी विचारले होते.

कांदळवनांमध्ये अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी वारंवार येत असतात असे नमूद करतानाच एप्रिल २०१५ ते जुलै २०१७ या कालावधीत कांदळवनांतील ३७०५ अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.