मुंबई विमानतळावर ३६ कोटींचे कोकेन पकडले

4

सामना ऑनलाईन । मुंबई
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबई विमानतळावर धडक कारवाई केली. एका तरुणाला तब्बल सहा किलोच्या कोकेनसह रंगेहाथ पकडले. फ्रेडी अण्ड्रेस असे त्या तस्कराचे नाव आहे. त्याने लॅपटॉपमध्ये लपवलेला ३६ कोटींचा कोकेनचा साठा जप्त केला आहे. विमानतळावर एक तरुण लॅपटॉपमधून कोकेनची तस्करी करणार असल्याची खबर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीच्या पथकाने विमानतळावर सापळा रचून फ्रेडी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या लॅपटॉपमध्ये कोकेनचे १२ पॅकेटस् लपवून ठेवले होते.

अल्पवयीन मुलीचे अपहरण
कुरारच्या आप्पा पाडा परिसरातील सह्याद्री चाळीत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीचे एका तरुणाने अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पुरुषोत्तम चिमटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुरार पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

५४ लाखांचे सोने जप्त
कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाने बँकॉकहून आलेल्या विजय जगदीश आणि मफतलाल या दोघा प्रवाशांना सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत ५४ लाख रुपये किमतीचे १८२३ गॅम वजनाचे सोने जप्त केले.

चपलेत सोने तर गुप्तांगात धातूची पावडर लपवून तस्करी
चपलेच्या सोलमध्ये सोन्याची बिस्किटे तर गुप्तांगात धातूची महागडी पावडर लपवून तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा प्रवाशांना कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत तब्बल २१ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. श्रीलंकेचा नागरिक असलेला मोहम्मद सुफियान निझामदीन (४३) हा श्रीलंकन एअरवेजच्या विमानाने मुंबईत आला होता. विमानतळावर संशयावरून कस्टमच्या अधिकाऱ्यांची त्याची झडती घेतली त्यावेळी त्याने घातलेल्या चपलेच्या सोलमध्ये लपवलेली ५०० ग्रॅम वजनाची सोन्याची पाच बिस्किटे सापडली. १४ लाख ७५ हजार इतकी या सोन्याची किंमत आहे. याशिवाय हाँगकाँगहून आलेल्या नसिमा गफूर मणियार या महिलेला धातूच्या पावडरची तस्करी करताना पकडण्यात आले. ३०० ग्रॅम वजनाची आणि सात लाख रुपये किमतीची धातूची पावडर एका पॅकेटमध्ये पॅक करून ते पॅकेट नसिमा हिने गुप्तांगात लपवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या