लैंगिक शोषणाच्या आरोपीला 4.5 कोटी डॉलरचे एक्झिट पॅकेज

सामना ऑनलाईन, सॅनफ्रान्सिस्को

गुगल कंपनीने लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अमित सिंघल या कार्यकारी पदावरील माजी कर्मचाऱ्याला कंपनी सोडण्यासाठी 4.5 कोटी डॉलरचे एक्झिट पॅकेज दिले होते. अमित सिंघल यांनी 2016 साली गुगल कंपनीतून राजीनामा दिलेला आहे.  याआधी सिंघल यांना दिलेल्या पॅकेजची माहिती कुणालाच नव्हती. मात्र गुगलची प्रमुख कंपनी एल्फाबेटच्या शेअरधारकाने दाखल केलेल्या कायदेशीर वादानंतर सोमवारी सिंघल यांना दिलेल्या पॅकेजची माहिती उजेडात आणली.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या कर्मचाऱ्याला कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याऐवजी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात भरपाई देऊन जबाबदारीचे उल्लंघन केल्याचा आरोप शेअरधारकाने बोर्ड सदस्यांवर ठेवला आहे. सिंघल यांचा जन्म उत्तरप्रदेशात झांशी येथील असून त्यांनी आयआयटी रुरकी येथून इंजिनियरींगची पदवी मिळवली आहे.  त्यांनी 15 वर्षे गुगलच्या सर्च टीममध्ये महत्त्वाचे काम केले होते.