थर्टीफस्टच्या पार्टीनंतर तीन अपघातात चौघांचा मृत्यू

प्रातिनिधिक फोटो

ब्रिजमोहन पाटील । पुणे

थर्टी फस्टच्या पार्टीनंतर दुचाकीवरून जाताना झालेल्या तीन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू झाला. तर एका तरूणीसह दोघेजण गंभीर जखमी झाली आहे. या घटना कर्वे रस्ता, वारजे, कोंढवा येथे घडल्या आहेत.

अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील करिश्मा चौक येथील अपघातात स्वराज विजय अराज (वय २०) हा ठार झाला तर त्याची मैत्रीण ऋतुंबरा धोत्रे (वय १९, दोघे रा. अकोला) ही गंभीर जखमी झाली आहे. स्वराज, ऋतुंबरा आणि त्यांचे मित्र भुगाव येथील हॉटेल हिलटॉप येथे पार्टीसाठी गेले होते. तेथून परत येताना कर्वेनगर येथे स्वराजची दुचाकी करिश्मा चौकात घसरली. त्यात त्याचा मृत्यू झाला. मागे बसलेली ऋतुंबरा गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

अजिंक्य शरद डुंबरे (वय २६, रा. विठ्ठलवाडी, सिंहगड रस्ता), नकुल नवतीन परमार (वय २८, रा. बोरोवली) असे वारजे येथील घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात शिक्षणासाठी राहत असलेले अजिंक्य डुंबरे आणि परमार हे दोघे थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी गेले होते. पार्टी संपल्यानंतर ते घरी धायरीच्या दिशेने जात असताना पहाटे पावणे चारच्या सुमारास मुंबई-बंगळूर महमार्गावर मुठा नदीच्या पुलाजवळ त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, असे उपनिरीक्षक आर. पी. क्षीरसागर यांनी सांगितले.

कोंढवा येथे लुल्लानगर येथील कुबेर कॉलनी समोर मद्यधुंद तरूणांनी दुचाकीची रेस लावली. या रेसमध्ये दुचाकी स्पीडब्रेकरवरून जोरात उडाली व त्यामुळे दुचाकीवर बसलेला फिरोज महेबुब शेख हा जोरात खाली पडला. भरधाव दुचाकीवरून पडल्याने फिरोजचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे साडे तिनच्या सुमारास घडली, अशी माहिती सहाय्यक निरीक्षक एस. व्ही. तासगावकर यांनी दिली.