नागपूरमध्ये ‘बीफ’?… कथित गोरक्षकांची एकाला जबर मारहाण, ४ अटकेत

सामना ऑनलाईन । नागपूर

अॅक्टिव्हा गाडीतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून एका इसमाला कथित गोरक्षकांनी जबर मारणहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आपल्याला गोरक्षक म्हणणाऱ्या चारजणांना अटक करण्यात आली आहे.

नागपूरच्या जलालखेडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या भरसिंगी भागात ४ आरोपींनी सलीम इस्लाम शहा या इसमाला अॅक्टिव्ही गाडीतून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून जबर मारहाण केली. माझ्या गाडीत मांस असले तरी ते गोमांस नाही, अशी विनवणी सलीम करत होता मात्र या कथित गोरक्षांनी त्याचे काही एक न ऐकता त्याला चोप दिला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप करत सलीमला गोरक्षकांच्या तावडीतून सोडवले. त्याला खूप मार लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर मारझोड करणाऱ्या मोरेश्वर तांदुळकर, रामेश्वर तायडे, जगदीश चौधरी, अश्विन उईके या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सलीमच्या अॅक्टिव्हामध्ये आढळलेले ते मांस गायीचे आहे की अन्य प्राण्याचे याचा तपास करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती मिळते.