पोलिसांनी संशयित आरोपीचा कोठडीत केला खून, ४ पोलिसांना अटक

सामना प्रतिनिधी । सांगली

चोरी प्रकरणातील संशयित आरोपी अनिकेत कोथळे (२६) याचा पोलिसांनी बेदम मारहाण करून पोलीस कोठडीत खून केला व त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी आंबोली घाटात जाळून पुरावा नष्ट करण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. संपूर्ण पोलीस यंत्रणेला काळिमा फासणाऱ्या या घटनेचे तीक्र पडसाद आज सांगली शहरात उमटले. शहर पोलीस ठाण्याला बंदोबस्त लावण्याची पाळी आली. तरीही लोकांनी मोठय़ा संख्येने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारून पोलीस यंत्रणेचा धिक्कार केला. दरम्यान या खून प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह चार पोलीस व एका झिरो पोलिसाला अटक करण्यात आली असून कामटेंना सेवेतून निलंबित करण्यात आल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या सर्व प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल व आरोपी पोलिस आहेत म्हणून कुणालाही पाठिशी घातले जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

चोरी प्रकरणी सांगली पोलिसांनी सोमवारी अमोल भंडारे आणि अनिकेत कोथळे या दोन आरोपींना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना आठ तारखेपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. या प्रकरणाचा अधिक तपास तपास अधिकारी उपनिरीक्षक युवराज कामटे यांचे पथक करत होते. तपासासाठी बाहेर काढले असता हे दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्याचा बनाव करून तशी फिर्याद पोलीस ठाण्यात कामटे यांनी नोंदवली होती. मात्र कोथळे याच्या नातेवाईकांनी आपल्या मुलाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून या प्रकरणाची चौकशी करावी या मागणीसाठी काल दिवसभर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मारला होता. आज या सर्व प्रकरणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आज तातडीने पत्रकार बैठक घेऊन दिलेली माहिती अशी, चोरीच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे या संशयित आरोपीला सोमवारी रात्री आठ वाजता थर्ड डिग्रीचा वापर करून उपनिरीक्षक युवराज कामटे व त्यांच्या पथकातील हवालदार अरूण लाड, अरूण टोणे, सुरज मुल्ला यांनी बेदम मारहाण केली. या पोलीस मारहाणीत कोथळे ठार झाला. कोथळे मृत्यूमुखी पडल्याचे लक्षात येताच कामटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री नऊ वाजणेच्या सुमारात कोथळे याचा मृतदेह पोलिस ठाण्यातून सिव्हिल हॉस्पिटलला नेला. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर मॅनेज होत नसल्याचे पाहून दुसरा आरोपी अमोल भंडारे याच्यासह हवालदार लाड याच्या सिलेरो या खासगी गाडीतून आंबोली घाटात नेले व तिथे कोथळे याचा मृतदेह जाळला. मृतदेह अर्धवट जळाल्याचे लक्षात येता पुन्हा पेट्रोल आणून दुसऱयांदा मृतदेह जाळला. याप्रकरणी कुणाला काही सांगितल्यास तुलाही अशाच पध्दतीने संपवू अशी धमकी अमोल भंडारे याला दिली आणि भंडारे हा निपाणीजवळ सापडल्याचा खोटा बनाव करून वरिष्ठांना तशी माहिती दिली. मात्र रात्रीपासून दुसरा पूर्ण दिवस कामटेच्या बोलण्यातून वारंवार विसंगती होत आहेत हे वरिष्ठांच्या लक्षात आले व या प्रकरणाचा जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी कसून तपास केला असता हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला.

संपूर्ण पोलीस यंत्रणेला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे. मात्र यात पोलीस आरोपी आहेत म्हणून त्यांना पाठिशी न घालता त्यांच्या विरोधात सबळ पुरावे निर्माण करून त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहिता ३०२, १२०, ३३०, ३३१, १४६, ३४ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे आणि या सर्व आरोपींना अटक केली आहे. यामध्ये उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अरूण टोणे, अनिल लाड, सुरज मुल्ला, राहुल शिंगटे आणि झिरो पोलीस झाकीर पट्टेवाला या सहाजणांचा समावेश आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी त्या दिवशी रात्री नऊ वाजता पोलीस ठाण्याला व्हिझीट केली त्यावेळी लॉकपमधील हे दोन आरोपी नसल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावेळी त्यांनी कामटे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. रात्री बारा वाजता कृष्णा घाटानजिक कामटे मोटरसायकलवरून जाताना उपाधीक्षक काळे यांना भेटले त्यावेळीही ते समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. त्यावरून यात काळेबेरे घडल्याचा संशय आल्यानेच आमच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी तपास केला आणि कामटेच्या या गैरकृत्याचा पर्दाफाश झाला. कामटे यांनी रात्री नऊ वाजता पोलिस ठाण्यातून मृतदेह हलवला त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱया सर्व पोलिस कर्मचाऱयांची चौकशी केली जाईल तसेच लॉकअप गार्डचीही चौकशी करण्यात येईल.

san

लॉकअपमधील आरोपींला मारहाण होत असताना गार्डला माहित नसणे शक्य नाही. या सर्व शक्यता पडताळून आम्ही चौकशी करणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले. उपनिरीक्षक युवराज कामटे याला काल रात्रीच सेवेतून निलंबीत केल्याचेही नांगरे-पाटील यांनी सांगितले.

प्रचंड संताप, पोलिसांचा निषेध
आज दुपारी अनिकेत कोथळे याचा पोलिसांनी खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी मोठय़ा संख्येने पोलिस ठाण्याकडे धाव घेत ठाण्यासमोर ठिय्या मारला. या मार्गावरील सर्व वाहतूक रोखली. शहर पोलिस ठाण्याची सर्व प्रवेशद्वारे बंद करून प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. लोकांची वाढती गर्दी पाहून तातडीने पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. दिवसभर प्रचंड पोलिस बंदोबस्त होता तरीही जमाव पोलिसांच्या धिक्काराच्या घोषणा देत होते. उपनिरीक्षक कामटेला समोर आणा अशी संतप्त जमाव मागणी करत होता. तरी पोलीस ठाण्याकडे एकही वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही. उपअधीक्षत अमर निंबाळकर हे एकमेव अधिकार पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. शहरात कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील तळ ठोकून होते. दिवसभर संपूर्ण सांगली शहरात तणावाचे वातावरण होते.

sa

नातेवाईकांचा आक्रोश
काल दिवसभर पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसलेल्या नातेवाईकांना अनिकेतचा खून झाला असून त्याचा मृतदेहही परस्पर पोलिसांनी जाळला असल्याचे समजताच एकच आक्रोश केला. आई, पत्नी, भाऊ यांनी जीवाचा आकांत करीत पोलिसांचा उध्दार केला. अनिकेत कोथळे याचा विवाह झाला असून त्याला तीन वर्षाची मुलगी आहे. पोलिसांनी पहिल्याच गुह्यात संशयित आरोपी म्हणून त्याला अटक केली होती. अनिकेतला पोलिसांनी मारून ठार केल्याने संपूर्ण कुटूंब सुन्न झाले. या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी समाजसेवकांनी मोठी गर्दी केली होती. या परिसरात अत्यंत तणावपूर्ण वातावरण बनले होते.