नागपूरात चार वर्षाच्या मुलाची हत्या, पालकांमध्ये भिती

सामना ऑनलाईन । कन्हान

नागपूरच्या कन्हान भागात एका चार वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साईभरत कुचीपुडी असं या चिमुकल्याचे नाव असून त्याचा मृतदेह गावाजवळील कालव्यालगतच्या झुडपात आढळला. मागील २० तासांपासून साईभरत बेपत्ता होता.

रविवारी साईभरत घरासमोर खेळत असताना तो परत न आल्याने त्याच्या कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. कुटुंबियांनी रात्रभर त्याची आसपासच्या गावात शोधाशोध केली. मात्र तो कुठेच सापडला नाही. याबाबत पोलिसांनाही सूचना देण्यात आली होती. शोध सुरू असतानाच कालव्यालगतच्या एका झुडपात साईभरत मृतावस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. गेल्या दोन महिन्यात या भागातील तीन मुलाचे अपहरण झाले असून त्यातल्या दोघांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.