व्हेल माशाचा भूकबळी; पोटात सापडले 40 किलो प्लॅस्टिक

सामना ऑनलाईन, मनिला

फिलिपिन्समध्ये एका व्हेल माशाच्या पोटात तब्बल 40 किलो प्लॅस्टिक सापडले. पोटात प्लॅस्टिक साचल्यामुळे व्हेल मासा काहीच खाऊ शकला नसावा, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला. पोटात प्लॅस्टिक गेल्याने मासा आजारी होता. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिक पोटात जाऊन माशाचा मृत्यू होण्याची ही सर्वात गंभीर घटना असल्याचे घटना आहे.

दक्षिण फिलिपिन्सच्या कम्पोस्टेलामध्ये 4.7 मीटर लांबीचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर धक्कादायक बाबी समोर आल्या.  माशाच्या पोटात तब्बल 40 किलो प्लॅस्टिक आढळले. यामध्ये प्लॅस्टिकच्या पिशव्या, अन्नधान्यांच्या पोत्यांचा समावेश होता. प्लॅस्टिकचा कचरा खाल्ल्याने व्हेल माशाला गॅसचा त्रास झाला. त्यामुळे माशाला आणखी काहीच खाता आलं नाही आणि त्याचा भूकबळी गेला.

आम्ही गेल्या दहा वर्षांमध्ये 62 डॉल्फिन आणि काही व्हेल माशांचे शवकिच्छेदन केले आहे. मात्र याआधी कधीच कोणत्याही माशाच्या पोटात इतक्या मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिक सापडले नव्हते, अशी माहिती डी बोन कलेक्टर म्युझियमचे संचालक डॉरेल ब्लेचले यांनी दिली. व्हेल मासा अतिशय कमजोर झाला होता. त्याला पोहण्यातही अडचणी येत होत्या, असे मत्स्य विभागाच्या संचालिका फातिमा इद्रिस यांनी सांगितलं. फिलिपिन्समध्ये प्लॅस्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाची समस्या अतिशय गंभीर आहे. फिलिपिन्समध्ये पुनर्प्रक्रिया होणारे प्लॅस्टिक वापरले जात नाही. महासागर प्रदूषित करणाऱ्या देशांमध्ये फिलिपिन्सचा समावेश करण्यात आलेला आहे.