New Zealand – दोन मशिदीमध्ये अंदाधुंद गोळीबारात 49 जणांचा मृत्यू

सामना ऑनलाईन । ऑकलंड

न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथे शुक्रवारी दोन मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात आतापर्यंत 49 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आंद्रेन यांनी ही माहिती दिली आहे. सैनिकाच्या वेशात आलेल्या हल्लेखोराने अॅटोमॅटीक रायफलमधून अंदाधुंद गोळीबार करत मशिदीमध्ये अक्षरश: मृतदेहांचा खच पाडला. यावेळी एका हल्लेखोराने गोळीबाराचे सोशल मीडियावरून LIVE प्रक्षेपण केले. या गोळीबारप्रकरणी आतापर्यंत एक महिला आणि 3 पुरुष अशा 4 संशयीतांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती न्यूझीलंड पोलिसांनी दिली आहे.

न्यूझीलंडच्या साऊथ आयलँडवरील ख्राइस्टचर्च शहरात शुक्रवारी दोन वेगवेगळ्या मशिदींमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला. ख्राइस्टचर्चमधील अल नूर मशिदीत शुक्रवारच्या नमाजसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेवून हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. तर दुसरीकडे लिनवूड येथील मशिदीतही गोळीबार करून अनेकांचा बळी घेतला आहे. पोलिसांनी या हल्लेखोरांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली आहेत. मशिदीच्या परिसरातील वाहनांना ही स्फोटके जोडली होती.

दरम्यान, न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आंद्रेन यांनी आजचा दिवस न्यूझीलंडच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचं म्हटलं आहे. हिंसेला न्यूझीलंडच्या भूमीवर थारा नाही, अशा शब्दांत त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. गोळीबार झाला त्यावेळी बांगलादेशचा क्रिकेट संघ देखील नमाज पढण्यासाठी मस्जिद-अल- नूरम मशिदीत गोला होता. मात्र सुदैवाने त्यांना कोणत्याही प्रकारतची इजा झाली नाही.