ठाण्यात ‘कोवळी पानगळ’, मेट्रोच्या कामामुळे छोट्या 400 झाडांचा बळी

11


सामना प्रतिनिधी । ठाणे

वडाळा – ठाणे – कासारवडवली या मेट्रो चार प्रकल्पासाठी सुरू असलेल्या खोदकामाने आतापर्यंत तब्बल 400 फुलझाडांचा बळी घेतला आहे. मुलुंडच्या मॉडेला चेक नाका येथील अँपलॅब चौकापासून ते टिपटॉप प्लाझापर्यंत असलेल्या दुभाजकादरम्यानच्या झाडांचा मेट्रोच्या कामाने जीव घेतला आहे. भविष्यात कासारवडवलीपर्यंतच्या मेट्रो कामाखाली चिरडल्या जाणाऱ्या छोट्या झाडांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. त्यामुळे ’कोवळी पानगळ’ रोखण्यासाठी ठाणे पालिकेसह वृक्षप्रेमी सरसावले आहेत.

मेट्रो चार प्रकल्पाचे ठाणे शहरात काम प्रगतिपथावर आहे. वडाळा – ठाणे – कासारवडवली या टप्प्यांतर्गत मुलुंडच्या मॉडेला चेकनाक्यापासून मेट्रोच्या कामाने ठाणे शहरात प्रवेश केला आहे. या कामासाठी रस्त्याच्या दुभाजकाभोवती पत्रे उभारून आतमध्ये पायलिंग सुरू आहे. यावेळी काँक्रीट रस्त्याला खणताना उडणाऱ्या धुळीने दुभाजकावरील लहानसहान फुलझाडं आधीच कोमेजून गेली आहेत. तर अँपलॅब चौक ते टिपटॉप प्लाझा या 450 मीटर अंतरातील दुभाजकांचा बळी दिल्याने येथील 400 फुलझाडे गायब झाल्याचा आरोप ठाणे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे कौस्तुभ दरवेस यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यात या फुलझाडांसह हरित जनपथाचा जीव वाचवण्यासाठी दरवेस यांनी ठाणे पालिकेच्या संयुक्त विद्यमाने पुनर्रेपण कामाला सुरुवात केली आहे.

उद्याने बहरणार
कासारवडवलीपर्यंत मेट्रोच्या कामासाठी उभारलेल्या पत्र्यांच्या आड दुभाजकांवरील झाडांचा जीव घेतला जाणार होता. त्यामुळे दरवेस यांनी ठाणे पालिकेच्या उद्यान विभागाशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार उद्यान विभागाचे राहुल दुर्गुडे यांनी ही झाडे शहरातील उद्यानात पुनर्रेपण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तब्बल 12 किलोमीटरच्या पट्ट्यांतील हजारो झाडांचा तसेच हरित जनपथावरील हिरवळीचा जीव वाचणार असून या झाडांना मोठमोठ्या गृहसंकुलातदेखील पुनर्रेपणासाठी दिले जाणार असल्याचे दरवेस यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या